महिलांवर अत्याचार वाढले
By Admin | Updated: September 11, 2015 00:34 IST2015-09-11T00:34:01+5:302015-09-11T00:34:01+5:30
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले असून ही गंभीर बाब असताना याकडे शासनकर्ते गांभिर्याने दखल घेत नाही, ....

महिलांवर अत्याचार वाढले
पत्रपरिषद : राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
अमरावती : मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले असून ही गंभीर बाब असताना याकडे शासनकर्ते गांभिर्याने दखल घेत नाही, असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे गुरुवारी पत्रपरिषदेत केला.
वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विदर्भाच्या दौऱ्यावर त्या आल्या असता त्यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना महिलांचे प्रश्न, समस्यांवर हात घातला. चित्रा वाघ यांच्या मते, आज महिलांची सुरक्षितता, रोजगार, शिक्षण व आरोग्य असे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. विशेषत: विदर्भात कुमारी मातेचा प्रश्न, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुलींना ‘मिसींग’ करुन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जात आहे. या मुली गायब करताना त्या नक्षलवादी चळवळीत सामील झाल्याचा देखावा केला जातो, असा आरोप त्यांनी केला. शासन कोणतेही असो महिलांबाबत फार सकारात्मक पावले उचलत नाही. मी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात दौरे करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्यांदा विदर्भात आले आहे. अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असून हेवेदावे बाजूला सारून नव्याने बांधणी केली जाईल, असे त्या म्हणाल्यात. महिलांचे प्रश्न, समस्या सोडविताना शिवणकाम, शेळी व्यवसायातून रोजगार उभारण्याचे मानस आहे. महिलांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्याकरीता ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. तसेच मुलींच्या आश्रमशाळांना भेटी देऊन त्याचे प्रश्न, समस्या जाणून घेताना त्या शासनस्तरावर सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना काही दिवसांपूर्वी महिलांच्या सुरक्षितेतविषयी ‘बेस प्लॅन’ विचारला असता ते सकारात्मक उत्तर देऊ शकले नाही, असे वाघ यांनी सांगितले. महिलांचे हक्क, प्रश्न सोडविण्यासाठी वस्ती, वाड्यांवर जाऊन जनजागृती केली जाईल, असेही त्या म्हणाल्यात.
पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, नागपूरच्या नगरसेविका प्रगती पाटील, संगीता ठाकरे, नीलिमा महल्ले, मेघा हरणे, सपना ठाकूर आदी उपस्थित होत्या.
शरद पवारांच्या नामोल्लेखाने विरोधकांना प्रसिध्दी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नामोल्लेख केल्याशिवाय विरोधकांना प्रसिध्दी मिळत नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. यूपीए शासनाच्या काळात महिलांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. सक्षमीकरण, रोजगार, महिला सुरक्षा आदींवर भर देण्यात आला. त्यामुळे आज गावखेड्यात बचतगटाचे जाळे पसरले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने राज्यभर महिलांच्या मूलभूत सुविधांसाठी लढा दिला जाणार, असे त्या म्हणाल्या. सिंचन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी सुरू झाल्याबाबतच्या प्रश्नांवर त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी चौकशी सुरु झाल्याचे सांगिून प्रश्नाला बगल दिली.