फेरीवाल्यांकडून अतिक्रमण निर्मूलन विभागाची तोडफोड
By Admin | Updated: July 19, 2016 00:10 IST2016-07-19T00:10:28+5:302016-07-19T00:10:28+5:30
मागील दहा दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा विरोध म्हणून ....

फेरीवाल्यांकडून अतिक्रमण निर्मूलन विभागाची तोडफोड
जेसीबीच्या काचा फोडल्या : राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल
अमरावती : मागील दहा दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा विरोध म्हणून सोमवारी सायंकाळच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी नवगर्जना संघटनेचे अध्यक्ष गणेश मारोडकर व अन्य २० ते २५ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हमालपुरा झोन कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या कक्षाची सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बेधुंद तोडफोड करण्यात आली. कार्यालयाबाहेरील दोन जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या तर कुत्तरमारे यांच्या दालनातील खुर्च्या, तावदाने फोडण्यात आली. यावेळी दुपारची कारवाई आटोपून कुत्तरमारे व त्यांचे सहकारी पुन्हा दुसऱ्या कारवाईसाठी रवाना झाले होते. हा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी शिपाई मजहर हुसैन, पुंडलिक मानके व देशमुख नामक चालक असे तिघेच कार्यालयात होते. कुत्तरमारे यांनी यासंदर्भात राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, १४३, १४७, १४८, ३, ४, डॅमेज आॅफ पब्लिक प्रॉपर्टी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान यासंदर्भात नवगर्जना हॉकर्स संघटनेचे उपाध्यक्ष सुरज चढार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या तोडफोडीला दुजोरा दिला. अतिक्रमण निर्मूलन कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य परत द्यावे, यासाठी अनेक फेरीवाले कुत्तरमारे यांना विनंती करण्यासाठी गेले होते. मात्र, कुत्तरमारे, सवाई आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी फेरीवाल्यांना परत पाठविल्याने संतापाच्या भरात त्यातील काहींनी कुत्तरमारेंच्या कार्यालयात तोडफोड केल्याची प्रतिक्रिया चढार यांनी दिली आहे.
गणेश मारोडकर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. बाहेरच्या जेसीबीच्या काचा फोडल्या, तथा दालनाच्या दरवाज्यासह खुर्च्यांची मोडतोड केली. या घटनेची तक्रार राजापेठ ठाण्यात नोंदविली आहे.
- गणेश कुत्तरमारे,
प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन विभाग.
अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, अशी तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यास पथक रवाना करण्यात आले आहे.
- शिशीर मानकर,
ठाणेदार, राजापेठ ठाणे.