महापालिकेतील ‘टोल फ्र ी’ नंबर 'डेड'
By Admin | Updated: August 2, 2016 00:15 IST2016-08-02T00:15:44+5:302016-08-02T00:15:44+5:30
मोठा गाजावाजा करून अमरावतीकरांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा दावा फुसका बार ठरला आहे

महापालिकेतील ‘टोल फ्र ी’ नंबर 'डेड'
तक्रार करायची कुठे ? : नागरिक हैराण
अमरावती : मोठा गाजावाजा करून अमरावतीकरांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा दावा फुसका बार ठरला आहे. शहरातील समस्या महापालिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी टोल फ्री नंबर जाहीर करण्यात आले. ते बहुतांश नंबर डेड झाले आहेत. ते पूर्ववत करण्याचा मुहूर्त पालिकेला सापडलेला नाही.
शहरातील रस्ते, नाल्या, पाणी,वीज, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फलकबाजी व अन्य इतर समस्यांबाबत तक्रारी करण्यासाठी महापालिका यंत्रणेने लॅन्डलाईन क्रमांकासह टोल फ्री नंबर जाहीर केले. त्यातील १८००-२३३-६४५० हा क्रमांक वगळता फलकासंदर्भातील १८००-२३३-६४४० आणि १८००-२३३-६४४१ हे दोन्ही टोल फ्री क्रमांक वर्षभरापासून बंद आहेत. या दोन्ही क्रमांकावर संपर्क केल्यास या दूरध्वनीवरील सुविधा काही कालावधीकरीता बंद करण्यात आली आहे, असे उत्तर मिळते.
अनधिकृत जाहिरातींसाठी १८००-२३३-६४४० आणि १८००-२३३-६४४१ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, दोन्ही क्रमांक बंद असल्याचे बाजार परवाना विभागाच्या गावीही नाही. याशिवाय २६७३५०१ व २५७६४६९ या दोन क्रमांकावरही अनधिकृत फलकबाजीसंदर्भातील तक्रारी नोंदविण्याचे आवाहन बाजार परवाना विभागाने केले होते. यातील २६७३५०१ हा क्रमांक बंद असून २५७६४६९ हा क्रमांक टोल फ्री नसल्याचे सांगितले जात.
१८००-२३३-६४५०
टोल फ्रीवरुन ढकलाढकली
महापालिकेच्या संकेतस्थळावर १८००-२३३-६४५० टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.या क्रमांकावर संपर्क साधला असता निव्वळ टोलवाटोलवी केली जाते. गढूळ पाणी आणि सार्वजनिक नळासंदर्भात तक्रार केली असता मजीप्राकडे जाण्याचा व महापालिकेत येऊन लेखी देण्याचा सल्ला दिला जातो. (प्रतिनिधी)
नको ती तक्रार
अनधिकृत होर्डिंग्ज संदर्भातील दोन्ही टोल फ्री क्रमांकासह लॅन्डलाईनही बंद असल्याने व एकमेव सुरु असलेल्या टोल फ्री वर टोलवाटोलवी केली जात असल्याने, नको ती तक्रार असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कुठे करायचा एसएमएस?
९९७०००१३१२ या क्रमांकावर एसएमएस करुन तक्रार नोंदवा, असे आवाहन महापालिकेच्या संकेतस्थळावरुन करण्यात आले आहे. हा क्रमांक अनेक दिवसांपासून बंद झाला असताना दुसरा क्रमांक उपलब्ध करुन देण्याचा मुहूर्त पालिकेला मिळालेला नाही.