रेल्वे ट्रॅकवर सोडली जाते शौचालयातील घाण
By Admin | Updated: October 27, 2015 00:18 IST2015-10-27T00:18:19+5:302015-10-27T00:18:19+5:30
स्वच्छ व सुंदर भारत’ या ब्रीद वाक्याला रेल्वे प्रशासनाकडूनच फाटा दिला जात असल्याचा प्रत्यय प्रवाशांना बडनेरा रेल्वे स्थानकावर येत आहे.

रेल्वे ट्रॅकवर सोडली जाते शौचालयातील घाण
टाके ओव्हरफ्लो : प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, तक्रार नोंदवूनही कार्यवाही शून्य
बडनेरा : स्वच्छ व सुंदर भारत’ या ब्रीद वाक्याला रेल्वे प्रशासनाकडूनच फाटा दिला जात असल्याचा प्रत्यय प्रवाशांना बडनेरा रेल्वे स्थानकावर येत आहे. प्रतीक्षालयाच्या शौचालयाचे टाके घाणीने भरले आहेत. ही घाण थेट रेल्वे ट्रॅकवर सोडली जात असल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निमार्ण झाला आहे.
येथील रेल्वे स्थानक ‘जंक्शन’ म्हणून भारतभर नावारुपास आले आहे. येथून दरदिवसाला बऱ्याच प्रवासी गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात. त्यामुळे मोठा प्रवाशी वर्ग येथून प्रवास करतो. रेल्वे स्थानकाची व्याप्ती लक्षात घेता रेल्वे प्रशासनानेदेखील या रेल्वेस्थानकाचा कायापालट केलेला आहे. परंतु धोकादायक विषयाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्लॅटफार्मवरील प्रतीक्षालयाच्या शौचालयाचे टाके घाणीने भरले आहे. ही घाण सरळ रेल्वे ट्रॅकवर सोडली जात आहे. प्रवाशांनी याची लेखी तक्रार रेल्वे स्थानकाच्या तक्रार पुस्तिकेत केली आहे. गेल्या महिन्यापासून शौचालयाचे टाके स्वच्छ करण्यात आलेले नाही.
एस.सी.जैन व अनिल जैन नामक प्रवाशाने या शौचालयाच्या घाणीची तक्रार संबंधितांकडे दिली आहे. शौचालयाचे हे टाके भरल्याची बाबदेखील येथील स्टेशन मास्तर व संबंधित सेक्शन इंजिनिअरिंग विभागाला सांगण्यात आल्याची माहिती आहे. महिनाभरात तीनदा माहिती देऊनही शौचालयाचे टाके स्वच्छ करण्यात आलेले नाहीत. नाईलाजास्तव घाण प्लॅटफार्मवर पसरू नये, यासाठी ट्रॅकवर ती सोडली जात आहे. यामुळे प्रवासीवर्गाला मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.
एकीकडे सरकार ‘स्वच्छ व सुंदर भारत’ या अभियानावर भर देत आहे. रेल्वे स्थानक, रेल्वे गाड्यांमध्येदेखील स्वच्छता ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र बडनेरा रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयातील शौचालयाची अवस्था पाहून या अभियानाला त्यांच्याकडूनच फाटा दिला जात असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे विभागाद्वारे प्रवाशांना अद्ययावत सुविधा पुरविण्यावर नेहमीच भर दिला जातो. परंतु घाणीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा का दिला जात नाही?, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. शौचालयाचे टाके स्वच्छ करावे, अशी मागणी केली जात आहे.