आज मंगळ, शनी पृथ्वीच्या समीप
By Admin | Updated: May 25, 2016 00:37 IST2016-05-25T00:37:16+5:302016-05-25T00:37:16+5:30
२५ मे रोजी मंगळ व शनि पृथ्वीच्याजवळ येणार आहे. ही अद्वितीय खगोलीय घटना १२ इंच व्यासाच्या आरशाच्या भव्य परावर्ती दूर्बिणीतून पाहता येणार आहे.

आज मंगळ, शनी पृथ्वीच्या समीप
अमरावती : २५ मे रोजी मंगळ व शनि पृथ्वीच्याजवळ येणार आहे. ही अद्वितीय खगोलीय घटना १२ इंच व्यासाच्या आरशाच्या भव्य परावर्ती दूर्बिणीतून पाहता येणार आहे. फरशी स्टॉप येथील विनाअपार्टमेंटमध्ये या नि:शुल्क शिबिराचे सायंकाळी ७ ते १० दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
मंगळ ग्रह यावर्षी जास्तीत जास्त पृथ्वीच्या जवळ आला असल्याने या ग्रहाचा स्पष्ट बिंदीसारखा गोल आकार, लाल रंग विशिष्ट परिस्थितीत त्यावरील दऱ्यांचे काळे डाग व ध्रृव प्रदेशावरील बर्फाची टोपी स्पष्ट दिसणार आहे. शनी ग्रहाचे सुंदर वलय व त्याच्यात टायटन नावाचा चंद्र पाहता येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषद अमरावती शाखा प्रमुख रवींद्र खराबे मार्गदर्शन करणार आहे. आकाशातील ठळक तारे, राशी, नक्षत्रे, अभिक्रा इत्यादींची माहिती करून दिली जाणार आहे.
ग्रह-ताऱ्यांविषयी नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे चर्चात्मक स्वरुपात निरसन केले जाणार आहे. तसेच खगोलशास्त्रात करिअर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम संपूर्णत: नि:शुल्क असून सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी खुला राहणार आहे.
अवकाशातील पिंडाबाबत जनसामान्यांत बरेच गैरसमज बाळगले जातात. वास्तविक कोणत्याच ग्रहाचा कोणाच्याच जीवनात तथा व्यवहारात हस्तक्षेप नसतो. कोणावरच ग्रहाचे बरे-वाईट परिणाम होत नाहीत. यासाठी जिज्ञासू, अभ्यासू तसेच विद्यार्थ्यांनी व पालकांनी सर्व गैरसमज झुगारून देऊन मंगलमयी मंगळ व विलोभनीय शनी गृहाचे अवलोकन करण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे, प्रवीण गुल्हाने, रोहीत कोठाडे, भूषण ब्राम्हणे व पंकज गोपतवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)