विरोधकांची सर्वपक्षीय संघर्षयात्रा आज जिल्ह्यात
By Admin | Updated: March 30, 2017 00:09 IST2017-03-30T00:09:17+5:302017-03-30T00:09:17+5:30
कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव व राज्यातील ढासळलेली कायदा, सुव्यवस्था आणि कर्जमाफीसाठी सभागृहात आवाज उठविणाऱ्या आमदारांवर झालेली निलंबन कारवाई .....

विरोधकांची सर्वपक्षीय संघर्षयात्रा आज जिल्ह्यात
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी : तिवसा येथे जाहीर सभा
अमरावती : कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव व राज्यातील ढासळलेली कायदा, सुव्यवस्था आणि कर्जमाफीसाठी सभागृहात आवाज उठविणाऱ्या आमदारांवर झालेली निलंबन कारवाई याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष व एमआयएमच्यावतीने२९ मार्चपासून सुरू केलेली चांदा ते बांदा ही संघर्षयात्रा जिल्ह्यात गुरूवार ३० मार्च रोजी दाखल होणार असून, तिवसा येथे सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा होणार आहे.
राज्यातील शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत असताना सरकार मात्र या बाबत गंभीर नाही. तसेच शेतात राबून पिकविलेल्या मालाला हमीभाव नसल्यामुळे हा माल व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात विकावा लागतो.
त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर व्यापारी मात्र मालामाल असल्याचा आरोपही संघर्ष यात्रेत उपस्थित करण्यात येणार आहे. अच्छे दिन आल्याचा कांगावा सरकारकडून करण्यात येत असला तरी नेमके इच्छे दिन आले कुणाचे असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना कर्जमाफीसाठी मंत्रालयात न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण झाली, राज्यातील कायदा व सुव्यवस्थासुद्धा बेलगाम झाली. याच पृष्ठभूमिवर सभागृहात आवाज उठविणाऱ्या आमदारांना निलंबित करण्यात आले.
सरकारच्या यासुलतानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी २९ मार्चपासून ही संघर्षयात्रा सुरू झाली आहे. यायात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. तिवसा येथे जाहिर सभेनंतर ही संघर्ष यात्रा चांदूररेल्वेला प्रयाण करणार असून रात्री ६ वाजता जाहीर सभा होणार आहे.
संघर्षयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. या संघर्षयात्रेतून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.