पूर्णा प्रकल्पामधून आज पाण्याचा विसर्ग

By Admin | Updated: July 4, 2016 00:02 IST2016-07-04T00:02:30+5:302016-07-04T00:02:30+5:30

तालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे सोमवार ४ जुलै रोजी धरणामधून १०० क्युरेक्स पाणी सोडण्यात येणार आहे.

Today, water dispute from Purna project | पूर्णा प्रकल्पामधून आज पाण्याचा विसर्ग

पूर्णा प्रकल्पामधून आज पाण्याचा विसर्ग

पाणीसाठ्यात वाढ : १०० क्युरेक्स पाण्याचा निचरा, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
चांदूरबाजार : तालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे सोमवार ४ जुलै रोजी धरणामधून १०० क्युरेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी धरणाची दारे १० सें.मी.ने उघडण्यात येतील.
पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार २ जुलै रोजी मध्यप्रदेश परिसरात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातील या तारखेच्या नियोजित साठ्यातील पाण्यात वाढ झाल्याने नियमानुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ३ जुलै रोजी नियमानुसार धरणातील पाणीसाठा हा ३० टक्के असायला हवा. परंतु मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे पाणी येण्याचे प्रमाण वाढल्याने हा साठा रविवारी ४५ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी धरणाची दारे १० सें.मी. उघडण्यात येणार असून यामधून प्रति सेकंद १०० घनमीटर पाण्याचा विसर्ग होणार आहे.
सुरूवातीला तीन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास टप्प्या-टप्प्याने नऊही दरवाजे १०-१० सेंमिने उघडले जाण्याची शक्यता आहे. पाण्याच्या विसर्गाबाबत, प्रकल्प प्रशासनाकडून महसूल विभागाला कळविण्यात आले असून त्यानुसार स्थानिक महसूल कार्यालयाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यात मागील सहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असून सहा दिवसांत तालुक्यात सरासरी ११९ मि.मी. इतका पाऊस झाल्याने परिसरातील नाले ओसंडून वाहात आहेत. पूर्णेचे पाणी गावात शिरल्याने मागील वर्षी परिसरात प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाण्याचा विसर्ग करण्याबाबत गावकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. ठरलेल्या साठ्यापेक्षा जादा पाणी धरणात साठवता येत नाही. त्यामुळे त्या पाण्याचा विसर्ग करावा लागतो. सोडलेले पाणी नदीपात्रातच राहील. सावधगिरी म्हणून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- आशिष राऊत,
डेप्युटी इंजिनिअर, पूर्णा प्रकल्प


धरणातील पाण्याचा १०० क्युरेक्स विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून मिळाली. त्याप्रमाणे ३ जुलैलाच मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांमार्फत नदीकाठावरील गावांना पुराच्या पाण्यापासून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- शिल्पा बोबडे,
तहसीलदार, चांदूरबाजार.

Web Title: Today, water dispute from Purna project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.