आजपासून गणेश विसर्जनाची लगबग
By Admin | Updated: September 27, 2015 00:13 IST2015-09-27T00:13:55+5:302015-09-27T00:13:55+5:30
जिल्ह्यात यंदा १ हजार ६६५ गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. रविवारपासून गणेश विसर्जनाची लगबग सुरू होणार आहे.

आजपासून गणेश विसर्जनाची लगबग
पोलिसांचा बंदोबस्त : वडाळी, छत्री, प्रथमेश तलावात विसर्जनाची सुविधा
अमरावती : जिल्ह्यात यंदा १ हजार ६६५ गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. रविवारपासून गणेश विसर्जनाची लगबग सुरू होणार आहे. गणेश विसर्जनादरम्यान मिरवणुकीसाठी जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
जिल्ह्यात १८ सप्टेंबर रोजी गणेश मंडळांनी गणपती स्थापना केली असून गणेश विसर्जनाच्या तयारीला आता वेग येणार आहे. रविवारी गणपती स्थापनेला १० दिवस पूर्ण होणार असून जिल्ह्याभरात गणेश विसर्जनाची धूम राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ हजार १५१ तर शहरात ५१४ गणेश मंडळांनी अधिकृत नोंदणी करून गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश विसर्जनावेळी काही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त लावला आहे. त्यातच गुन्हेगारी प्रवृतीच्या नागरिकांनाही नोटीस बजावून काही गुन्हेगारांना ताब्यातसुध्दा घेतले आहे. एसआरपीएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, पोलीस अधिकारी, होमगार्ड, सीआयडी, आरपीटीएस यांचा जिल्ह्यात बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांनाही बंदोबस्तादरम्यान उपस्थित राहण्याची विनंती पोलीस विभागाने केली आहे. त्यातच सिव्हील ड्रेसमध्येही पोलीस उपस्थित राहणार आहेत. गणेश विसर्जनासाठी वडाळी, छत्री व प्रथमेथ तलाव सज्ज करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सीसीटीव्हीची करडी नजर
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. शहरातील मुख्य मार्ग व विसर्जन स्थळावर नजर आहे. संवेदनशील ठिकाणी १५ ते १६ सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. नागरिकांनी उत्सव हा उत्सवाप्रमाणेच साजरा केला पाहिजे. उत्साहाच्या भरात दुसऱ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी भक्तांनी घेतली पाहिजे, असे आवाहन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.
विसर्जनस्थळी सुविधा, सुरक्षा
छत्री , प्रथमेश व वडाळी तलावजवळील सुविधा व सुरक्षेची शुक्रवारी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार व आ. रवी राणा यांनी पाहणी केली. यावेळी जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, किशोर पिवाल उपस्थित होते.