आज वाजणार शाळेची पहिली घंटा

By Admin | Updated: June 27, 2016 00:06 IST2016-06-27T00:06:51+5:302016-06-27T00:06:51+5:30

उन्हाळी सुटीनंतर शुक्रवार २७ जून रोजी शाळांची घंटा वाजणार आहे.

Today is the first hour of school | आज वाजणार शाळेची पहिली घंटा

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

प्रवेशोत्सव : वर्गावर्गात गुंजणार चिमुकल्यांचा किलबिलाट
अमरावती : उन्हाळी सुटीनंतर शुक्रवार २७ जून रोजी शाळांची घंटा वाजणार आहे. शाळा सुरू होणार असून विद्यार्थ्यांसह पालकदेखील प्रवेश घेण्यापासून ते शालेय साहित्य खरेदी करण्यात मग्न होते. ती सर्व तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे.
यावर्षी शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अतिशय उत्साह वर्धक वातावरणात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असाच असेल. नवप्रवेशित बालकांना शाळेची गोडी लगावी या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले असून मागील दोन दिवसांपासून सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक व अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. शाळेचा पहिला दिवस गोड करण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांना भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांची भरारी पथके कार्यरत राहणार असून तालुकास्तरावर स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत. मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेचा पहिला दिवस बालकांच्या स्मरणात राहावा व नवप्रवेशित बालकांमध्ये नवप्रेरणा जागृत व्हावी, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवप्रवेशित इयत्ता पहिली व चौथीच्या बालकांचे गोड पदार्थ भरवून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
नवीन शैक्षणिक संत्राला जिल्ह्यात शनिवारी प्रारंभ होत आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे जिल्ह्यातील मोझरी व चिखलदरा तालुक्यातील डोमी या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉम्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहे.

शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय राहवा या उद्देशाने विशेष तयारी करण्यात आली आहे. गुरुवारपासून सर्वच शिक्षक शाळेतील तयारीच्या कामाला लागले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचे स्वागत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात केले जाणार आहे. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.
- एस.एम. पानझाडे,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक

Web Title: Today is the first hour of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.