आजपासून चिखलदरा पर्यटन महोत्सव
By Admin | Updated: February 5, 2016 00:21 IST2016-02-05T00:21:09+5:302016-02-05T00:21:09+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

आजपासून चिखलदरा पर्यटन महोत्सव
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : रंगारंग कार्यक्रम, जंगल सफारी, गाविलगड भ्रमंती
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
विदर्भाचे उपेक्षित पर्यटनस्थळ म्हणून दुर्लक्षित स्थळाला पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न नगर परिषद पर्यटन विकास महामंडळ व जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने काही वर्षांपासून केला जात आहे. पोलीस परेड मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ५ ते ८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे, विशेष अतिथी म्हणून नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, खा. आनंदराव अडसूळ, खा. रामदास तडस, आमदार प्रभुदास भिलावेकर, सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रवी राणा, यशोमती ठाकूर, रमेश बुंदेले, अनिल बोंडे, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, पर्यटन सचिव वल्या नायरसिंह, महसूल विभागाचे सचिव विास खारगे, विभागीय आयुक्त डी.एस. राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित राहतील.
१९९२ ला पहिल्यांदा चिखलदरा पर्यटन महोत्सवाची मुहूर्तमेढ तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी रोवली. गाविलगड किल्ल्यावर हा पर्यटन महोत्सव झाला. मात्र त्यानंतर पुन्हा अवकळा आली. २००६ साली तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांनी पर्यटन महोत्सव अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान काही वर्षे पुन्हा लोकप्रतिनिधींची अनास्था झाली. स्व.सुधाकरराव नाईक यांच्यानंतर २३ वर्षांनी चिखलदरा पर्यटन महोत्सवाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत.
चिखलदरा पर्यटन महोत्सव ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान असला तरी पर्यटकांच्या खास आग्रहास्तव ८ फेब्रुवारी रोजी हिंदी, मराठी हास्य कविसंमेलन ठेवण्यात आले आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १२ वाजतादरम्यान रांगोळी रेखाटन व पतंगबाजी, दुपारी २ वाजता विविध साहसी उपक्रम पदभ्रमंती घोडा व ऊंट सफारी तर सायंकाळी महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेल्या गाविलगड किल्ल्यावर लाईट अॅन्ड साऊंड शोचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरासिलिंग, व्हॅलीक्रासिंग रॉकक्लायबिंग, पदभ्रमण, मॅरेथॉन स्पर्धा व साहसी उपक्रम तीन दिवस चालणार आहे. साहसी व विविध कार्यक्रमानंतर ५ ते ८ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजबानी राहील.(तालुका प्रतिनिधी)