तिवस्याचे वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे वादग्रस्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST2021-05-14T04:12:48+5:302021-05-14T04:12:48+5:30
सूरज दाहाट तिवसा : रेमडेसिविर या कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण सहा जणांना अटक ...

तिवस्याचे वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे वादग्रस्तच
सूरज दाहाट
तिवसा : रेमडेसिविर या कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण सहा जणांना अटक केली. यात तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे याचादेखील समावेश आहे. मालुसरे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांनी मालुसरेच्या निलंबनाचा प्रस्ताव अकोला येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे पाठविला आहे.
डॉ. मालुसरे हा सुरुवातपासूनच वादग्रस्त आहे. त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलन व निवेदने दिलीत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मालुसरे हा पाच वर्षांपासून तिवसा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. सुरुवातीला त्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात तिवसा येथे त्यांनी खासगी रुग्णालयदेखील टाकले होते. ग्रामीण रुग्णालयात आलेले रुग्ण तो आपल्या खासगी रुग्णालयात नेत होता, असाही आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, लढा संघटना यांनी तीन वर्षांच्या कालखंडात अनेक निवेदने जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांना दिली. मात्र, कारवाई झाली नाही.
बॉक्स
अमरावतीत कोविड रुग्णालय
पवन मालुसरे व त्याच्या काही डॉक्टर मित्रांनी अमरावती शहरात कोविड रुग्णालय सुरू केले होते. यात तिवसा ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब व कोविड रुग्णांसाठी आलेले रेमडेसिविर तो बाहेर नेऊन जादा किमतीने विकत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय असून तेथे ५० च्या आसपास रुग्ण हल्ली उपचार घेत आहेत. महिनाभरापासून येथे शासकीय रेमडेसिविर येत होते. त्यामुळे सरकारी दवाखान्यासाठी आलेले रेमडेसिविर डॉ.मालुसरे यांनी विकले काय, याचा सखोल तपास करणे गरजेचे आहे. मालुसरे यांचेकडून पाच रेमडेसिविर जप्त करण्यात आले.