तिवसा बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर
By Admin | Updated: March 11, 2016 00:29 IST2016-03-11T00:29:12+5:302016-03-11T00:29:12+5:30
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिवसा बसस्थानकास उतरती कळा लागली आहे.

तिवसा बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर
दुर्गंधी, अस्वच्छतेचा कहर : विद्युत दिवे बंद, अंधाराचे साम्राज्य
रोशन कडू तिवसा
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिवसा बसस्थानकास उतरती कळा लागली आहे. हे बसस्थानक जणू समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळणे तर दूरच पण सायंकाळनंतर अंधाराचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांसह बसस्थानकाच्या परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुमारे २० हजार लोकसंख्येचा टप्पा गाठत असलेले आणि अमरावती-नागपूर महामार्गावर वसलेले तिवसा पंचक्रोशीतील मध्यवर्ती गाव. तिवसासह तालुक्यातील तळेगाव ठाकूर, शेंदूरजनाबाजार, सुरवाडी, वरखेड, भारवाडी या गावांसह प्रवासी वर्गाची नेहमी वर्दळ असते. प्रशस्त जागा असलेल्या येथील स्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेसही मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सुविधा नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत वाहनचालकांकडे विचारपूस केली असता सायंकाळी अंधार पडल्यानंतर स्थानकात दिवे नसताना येथे कोण बसची वाट पाहत उभे राहील. त्यामुळे आम्ही बस सरळ तीनपाटीवर घेऊन जातो, अशी प्रतिक्रिया काही चालकांनी दिली.
स्थानकात विविध सुविधांचा अभाव आहे. दिवसा अनेक प्रवासी बसस्थानकात बसची वाट पाहत थांबलेले असतात. परंतु येथे प्रवाशांसाठी म्हणावी तशी सुविधा उपलब्ध नाही. पिण्याच्या टाकी आहे पण नळांना तोट्या नाही. पूर्वी येथे प्रवाशांना नाश्त्यासाठी एक कॅन्टीन होती. पण ती सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.
बसस्थानकालगत स्वच्छतेअभावी त्याची बिकट अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य असून त्यात प्रवेश करताच उग्र दुर्गंधीमुळे प्रवासी नाकाला हात लावत सरळ बाहेर पडतात. स्वच्छतागृहात साफसफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पाय ठेवायलाही स्वच्छ जागा नसल्याने प्रवासी स्वच्छतागृहाच्या बाहेर आडोसा बघून आपली सोय करून घेताना दिसतात. बसस्थानकात सायंकाळी काळोखानंतर बस प्रवेश करीत नसल्याने प्रवासी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला बसची वाट बघत उभे असतात. दिवसभरही अनेक प्रवासी बाहेरच उभे राहून बसची वाट बघतात. संबंधित विभागाकडून समस्यांबाबत तत्काळ निर्णय घेऊन गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.