थकीत करधारकांची मालमत्ता सील होणार

By Admin | Updated: January 8, 2016 00:06 IST2016-01-08T00:06:15+5:302016-01-08T00:06:15+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था कर, मालमत्ता कर अथवा बाजार व परवाना विभागाचा कर थकीत असल्यास ...

Tired property owners will be sealed | थकीत करधारकांची मालमत्ता सील होणार

थकीत करधारकांची मालमत्ता सील होणार

भामोरे फर्मला बजावली नोटीस : एलबीटी वसुलीसाठी महापालिकेचा निर्णय
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था कर, मालमत्ता कर अथवा बाजार व परवाना विभागाचा कर थकीत असल्यास आता संबंधितांच्या मालमत्ता ‘सील’ करण्याचा निर्णय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला असून येथील भामोरे फर्मकडे थकीत अडीच कोटी रुपयांच्या वसुलीसाठी प्रतिष्ठाने सील करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात जकात कराच्या तुलनेत एलबीटी करात सूट मिळावी, अशी दारु विके्रत्यांची मागणी आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश ठोक दारुविक्रेत्यांनी एलबीटी कराच्या तुटीची रक्कम अद्याप भरली नाही तर दुसरीकडे महापालिका एलबीटी विभागाने व्यवसायिकांचे कर निर्धारण सुरु केले असून यात ठोक दारुविक्रेत्यांकडे एलबीटी कराची रक्कम मोठ्या प्रमाणात थकीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जकात कराप्रमाणे एलबीटी दर निश्चितीचा विषय शासनस्तरावर प्रलंबित असताना आयुक्त गुडेवार यांनी कर वसुलीसाठी मोहीम सुरु केली आहे. थकीत कर असलेल्या मोठ्या व्यवसायिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. स्थानिक संस्था कर विभागाने येथील वाईन गॅलरी, वाईन सेंटर, आनंद लिकर्स व व्हाईट मिस चिफ या प्रतिष्ठांनाकडे एलबीटीचे थकीत असलेले सुमारे अडीच कोटी रुपये भरण्यासाठी प्रतिष्ठाने सील करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. १३ जानेवारीपर्यंत ही रक्कम भरण्यात आली नाही तर प्रतिष्ठाने सील करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. भामोरे फर्मच्या नावे वाईन व्यवसाय असून अचानक प्रतिष्ठाने सील करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याने त्यांना धक्का बसला आहे.
२५ दारुविक्रेते रडारवर
अमरावती : दारु व्यवसायात भामोरे यांचे बऱ्यापैकी नाव आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा केकतपूर येथे दारु निर्मितीचा कारखाना आहे. मात्र, आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भामोरे यांची प्रतिष्ठाने सील करण्याची कारवाई सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे एलबीटी कराचे निर्धारण युद्धस्तरावर सुरु करण्यात आले आहे. शहरात १० हजार नोंदणी असलेल्या प्रतिष्ठानच्या मालकांकडून एलबीटीकराबाबत व्यवसायाची मूळ बिले, आयकर संबंधित कागदपत्रे मागविली जात आहेत. त्याकरिता महापालिका एलबीटी विभागाने नोटीस बजावल्या आहेत. एलबीटी कराच्या फरकाची रक्कम दारु विक्रेत्यांकङे मोठ्या प्रमाणात थकीत आहे. पहिल्या टप्प्यात दारुविक्रेत्यांवर एलबीटीची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी लक्ष वेधले आहे. शहरात एलबीटी नोंदणी असलेल्या १३६ ंपैकी ८२ दारुविक्रेत्यांनी नियमानुसार कराची रक्कम भरली आहे. त्यापैकी उर्वरित दारुविक्रेत्यांवर कर वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. काही दारु व्यवसायिकांनी अभय योजनेत कराची रक्कम भरली आहे. पहिल्या टप्प्यात २५ दारुविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Tired property owners will be sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.