व्यापारी संकुलात पालिकेचे कोट्यवधींचे भाडे थकीत
By Admin | Updated: March 3, 2017 00:26 IST2017-03-03T00:26:27+5:302017-03-03T00:26:27+5:30
स्थानिक नगरपालिकेची करवसुली सध्या जोमात सुरू असून ही करवसुली पाणीपट्टी वसुली फक्त सामान्य नागरिकांकडूनच सक्तीने केली जात आहे.

व्यापारी संकुलात पालिकेचे कोट्यवधींचे भाडे थकीत
गरजेपुरतीच वसुली : तिजोरी मात्र रिकामीच
चांदूरबाजार : स्थानिक नगरपालिकेची करवसुली सध्या जोमात सुरू असून ही करवसुली पाणीपट्टी वसुली फक्त सामान्य नागरिकांकडूनच सक्तीने केली जात आहे. दुसरीकडे मात्र शासकीय इमारतीतील, व्यापारी संकुलातील दुकानभाडे, कर वसुली केली जात नसल्याने पालिकेचे लाखों रुपयांची थकबाकी तशीच पडून आहे.
मार्च महिना आला की, पालिकेला जाग येते ती कर वसुली, भाडे वसुली, पाणी पट्टी वसुली त्याकरिता पालिकेचे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरतात. मात्र अनेक वर्षांपासून थकीत असलेली व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे व कर वसुलीकडे पालिका नेहमीच हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते. त्यामुळे पालिकेची तिजोरी नेहमीच ठणठणाट असते. आवश्यकता आहे तितकी कर वसुली करून आपली भूक भागविल्याची ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे, तर दररोज होणाऱ्या या करवसुलीतून गोळा होणारी रकमेचा उपयोग काही जवळीक कंत्राटदारकांची देयके देण्यात प्राधान्य दिले जात आहे.
पालिकेची नुकतीच वार्षिक बजेटची बैठक संपन्न झाली असून यामध्ये पालिकेची थकबाकी, पाणी पट्टी वसुली, कर वसुली कर सक्तीने निर्णय घेतल्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार गावात ध्वनीक्षेपक फिरवून तसेच वर्तमानपत्रात जाहिरात देऊन थकीत करदात्यांनी कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र हे सर्व नियम व सक्ती ही शहरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांवरच केली जात आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या व्यापारी संकुलात भाडेतत्त्वावर राहणारे दुकानदार अनेक वर्षांपासून गाळ्याची पूर्ण रक्कमसुद्धा भरत नसून दुकान भाडे व कर मिळून पालिकेच्या मालमत्तेवरच लाखोंचा घरात रक्कम थकीत आहे.
तसेच शहराचा हद्दीतील पेट्रोलपंप, बँकां, पोस्ट आॅफीस, पोलीस स्टेशन, बसस्थानकसारख्या शासकीय कार्यालयांकडे लाखोंचे कर थकीत आहे. याच्याकडे असलेल्या थकीत कर वसुलीला पालिका धजावत असून सामान्य नागरिकांना मात्र सक्तीने वसुली करीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तर काही ठिकाणी पालिका कर्मचारी नगरसेवक व त्यांचा जवळील आप्तांना सॉफ्ट कॉर्नर देत असल्याची चर्चा सुरू आहे. या कर वसुलीमधील रकमेचा नियोजनबद्ध भरणा करण्याची इच्छा असूनही मागील सत्तारुढातर्फ लाखोंची देयकी थकीत करून ठेवली असल्याची ओरड काही नगरसेवक करीत आहे. मात्र पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यातील थकी त रकमेची पूर्ण वसुली केली, तर पालिकेची तिजोरीत पुन्हा एकदा खणखणाट होवू शकते हे मात्र निश्चित.
पालिकेच्या मालकीचे शिवाजी मार्केट, मौलाना आझाद मार्केट, टाऊन हॉलसमीचे व्यापारी संकुल नेताजी सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुल येथे दुमजली इमारतीत शेकडो दुकाने आहे.
या गाळ्यामध्ये अनेक वर्षांपासून दुकानदारांकडे कोट्यवधीचे भाडे थकित आहे. या गाळ्यातील दुकानांची वसुली आजवरही पूर्ण घेण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेची तिजोरीत नेहमीच ठणठणाट असते. (तालुका प्रतिनिधी)