यंदा फळांचा राजा आंबा रुसला
By Admin | Updated: April 21, 2016 00:07 IST2016-04-21T00:07:16+5:302016-04-21T00:07:16+5:30
वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाच्या फटक्याने यंदा फळांचा राजा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

यंदा फळांचा राजा आंबा रुसला
आवक घटली : वादळी पावसाचा फटका, भावही प्रचंड वधारले
अमरावती : वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाच्या फटक्याने यंदा फळांचा राजा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बाजारात आंब्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक आवक असणारा आंबा यंदा रुसला असा भास अमरावतीकरांना होत आहे.
उन्हाळा आला की, सर्वप्रथम आंबा फळाची आठवण येते, चवदार व रसाळ आंबा बाजारात पाहून नागरिकांना मोह आवरत नाही. मात्र, यंदा बाजारातून आंबा गायब झाल्यासारखेच चित्र आहे. दरवर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची प्रतिष्ठाने थाटली जातात. तसेच चौकाचौकात व गल्याबोळ्यामध्येही आंब्यांच्या हातगाड्या फिरताना दिसतात. मात्र, यंदा ती परीस्थिती दिसून येत नाही. यंदा बाजारात आंबा विक्रीचे प्रतिष्ठाने व हातगाड्या कमी झाल्या आहे. दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक असते. मात्र, यंदा अवकाळी पावसासह गारपीटीच्या तडाख्याने आंबा उत्पादकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ ३० टक्केच आंबा बाजारात आला आहे. एप्रिल २०१५ मध्ये बाजार समितीकडे दररोज ३०० ते ५०० क्विटंल आंब्याची आवक होती. मात्र, यंदाच्या एप्रिलमध्ये ती आवक कमी होऊन २०० ते ३०० क्विंटलवर आली आहे. सद्यस्थितीत कर्नाटक राज्यातून आंबा येत असून अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील आंब्याची आवक सुरु झाली नाही. त्यातच विदर्भातील आंबाही अद्यापर्यंत बाजारात आला नसून केवळ कैऱ्याच बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षांत २ ते ३ हजार रुपये भावात मिळणार आंबा यंदा ३ ते ६ हजारापर्यंत गेला आहे. त्यामुळे यंदा आंब्याची चढ्या भावाने विक्री केली जात आहे.