देऊतवाडा परिसरात व्याघ्र दर्शन

By Admin | Updated: March 15, 2017 00:03 IST2017-03-15T00:03:57+5:302017-03-15T00:03:57+5:30

मागील तीन दिवसांपासून देऊतवाडा, घोराड शेतशिवारामध्ये दोन वाघांनी धुकाकूळ घातला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tiger vision in the area around the village | देऊतवाडा परिसरात व्याघ्र दर्शन

देऊतवाडा परिसरात व्याघ्र दर्शन

पायांचे ठसे आढळले : वनाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसह मध्यरात्री पिंजला परिसर !
वरुड : मागील तीन दिवसांपासून देऊतवाडा, घोराड शेतशिवारामध्ये दोन वाघांनी धुकाकूळ घातला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान एका वाहनचालकाला दोन वाघांनी दर्शन दिल्याने खळबळ उडाली आहे.
वनाधिकारी दादाराव काळे यांना याबाबत माहिती मिळताच ते रात्रीच परिसरात रवाना होऊन गावकऱ्यासह शेतशिवार परिसरात पोहोचले. वाघांची शोधमोहीम राबविली गेली. मात्र, शोधमोहिमेदरम्यान वाघांच्या पायाचे ठसे आढळले आहेत. यावरून परिसरात वाघांचा वावर असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.
या घटनामुळे शेतकरी, शेतमजूर भयभीत झाल्याने त्यांनी शेतांवर जाणे बंद केले. धूळवडीला डांबरी रस्त्यावर दोन वाघांचे दर्शन घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांसह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वाघांची शोधमोहिम राबविली. जंगल तसेच शोतशिवारामध्ये शेतकऱ्यांनी एकटे जाऊ नये, अशा सूचना ग्रामस्थांना वनविभागाद्वारे देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनीधी)

चिरोडी जंगलात गाईची शिकार
पोहराबंदी: चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा-चिरोडी जंगलात काही महिन्यांपासून मुक्कामी असलेल्या ‘नवाब’ नामक वाघाने चिरोडी जंगलात गाईची शिकार केल्याची घटना मंगळवारी चार वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करुन गाईची शिकार, वाघांच्या पाऊलखुणा कैद केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, चिरोडी येथील रहिवासी भाऊसिंग राठोड यांच्याकडे पशूधन असून त्यापैकी एक पाळीव गाय पट्टेदार वाघाने फस्त केल्याची बाब समोर आली आहे. चिरोडी जंगलात पशूचराईकरिता गेले असता मध्य चिरोडी बीटमध्ये वनखंड क्रमांक ३४ मध्ये गाईची शिकार झाल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पट्टेदार वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. घटनास्थळी गायीचे अवशेष देखील आढळले आहेत. चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्राधिकारी अनंत गावंडे हे जंगलगस्तीवर असताना चिरोडी जंगलात गाईचे अवशेष आढळले. त्यानंतर या घटनेची माहिती उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना देण्यात आली. घटनास्थळी वाघांच्या पाऊलखुणा देखील आढळल्याने वाघानेच गाईची शिकार केल्याच्या निर्र्णयाप्रत वनविभाग पोहोचला आहे. त्यामुळे वाघ हा पोहरा-चिरोडी जंगलातच मुक्कामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला असून दगडाने तो परिसर अंकीत केला आहे. आरएफ ओ गावंडे यांनी वाघांच्या संरक्षणासाठी सलग आठवडाभर वनकर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. जंगलात अनोळखी व्यक्तीवर करडी नजर ठेवली जाईल.

ओलितावर परिणाम
वाघांच्या धास्तीने शेतीच्या कामांना खिळ बसली आहे. अनेकांच्या तुरी, कापूस शेतात पडून आहे. संत्रा सद्धा वाऱ्यावर आहे. ओलीत होत नसल्याने पिके सुकू लागली आहेत. गुरांच्या चराईचा प्रश्न निमाण होऊन गुराखी सुद्धा जंगलात जाण्यास धजावत नाही. परिणामी वाघांच्या भीतीने शेतीवर व शेतीच्या कामांवर वाईट परिणाम होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी शेतातील
जनावरे गावात हलविली !
शेतकरी शेतातील झोपडीमध्ये जनावरे तसे रखवालदार ठेवत असत. परंतु पाच दिवसांपासून वाघांच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेतातील गाई म्हशी, बकऱ्या, कोंबडया गावात हलविल्या असून शेताताील रखवालदारांनी सुद्धा झोपडया सोडून गावाकडे कूच केली आहे.

या परिसरात वाघ असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकरी, शेतमजुरांनी दुपारी तसेच रात्रीने शेतात एकटे जाऊ नये कुणालाही वाघ दिसल्यास याची माहिती तातडीने वनपरिक्षेत्र कार्यालयात द्यावी. यासाठी रेस्क्यू आॅपरेशन राबविण्यात येईल.
-दादाराव काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी

काही दिवसांपासून वाघांचे अस्तित्व जाणवत आहे. त्यांनी पाच पाळीव जनावरांचा फडशासुद्धा पाडला. याकरिता वनविभागाने ठोस पावले उचलावी.
-राहुल चौधरी, नागरिक

Web Title: Tiger vision in the area around the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.