करवार गावालगत वाघाने केली गाईची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:04+5:302021-04-06T04:12:04+5:30

पान २ ची लिड वाघाचा फोटो टाकणे लिंगा/वरूड : तालुक्यातील करवार येथील शेतकरी शनिवारी रात्री शेतातून बैलजोडी व ...

A tiger hunts a cow near Karwar village | करवार गावालगत वाघाने केली गाईची शिकार

करवार गावालगत वाघाने केली गाईची शिकार

पान २ ची लिड

वाघाचा फोटो टाकणे

लिंगा/वरूड : तालुक्यातील करवार येथील शेतकरी शनिवारी रात्री शेतातून बैलजोडी व गाय घरी आणत असताना, मागच्या मागेच गाय गायब झाली. पाहावयास गेले असता, वाघाने गायीची शिकार केल्याचे लक्षात आले. ही घटना रात्री ९ च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते. तीन दिवसांत वाघाने दोन शिकारी केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

करवार गावालगत सुधाकर कुमरे यांचे शेत आहे. हा जंगलव्याप्त परिसर असून, हिंस्त्र पशू वावरत असतात. ३ एप्रिल रोजी रात्री शेतातून बैलजोडी आणि गाय घरी आणत असताना, अचानक कुमरे यांची गाय मागे राहून गेली. घरी आल्यावर गाय दिसली नाही म्हणून गाईचा शोध घेण्यास ते गेले असता, गाय मृतवस्थेत दिसून आली. ३१ मार्चलासुद्धा लिंगा बीटमधे वाघाने एका गाईसह कालवडीचीे शिकार केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

कोट

लिंगा परिसरात वाघाने गाईची शिकार केली होती. पुन्हा करवार परिसरात शिकार केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री शेतावर जाणे टाळावे. सावध राहून शेतावर काम करावे. उन्हाळ्यामध्ये हिंस्त्र पशूचा वावर वाढत असल्याने काळजी घ्यावी.

- प्रशांत लांबाडे, वनाधिकारी, वरूड

-------------

मांजरखेड कसबा परिसरात वाघाने फस्त केले वासरू

वनविभागाला निवेदन : नुकसानभरपाईसह वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड कसबा परिसरात वाघाने गाईचे वासरू खाल्ल्यामुळे त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी भारत केशवराव बोबडे यांनी शनिवारी चांदूर रेल्वे वनविभागाला एका निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील मांजरखेड (कसबा) - तरोडा शिवारात भारत बोबडे यांचे शेत आहे. या शेतात गाईचा गोठा असून, तिथे जनावरे बांधलेली असतात. १ एप्रिल रोजी रात्री गोठ्यातील एक वासरू ओढत नेऊन वाघाने त्याची शिकार केली. २ एप्रिल रोजी रोजी भारत बोबडे शेतात गेले असता, गोठ्यातुन वासरू कोणी तरी घेऊन गेल्याची शंका मनात आल्याने त्यांनी थोडा शोध घेतला. शेतामध्ये वासराला ओढत नेल्याच्या खुणा होत्या. त्या मार्गाने शोध घेतला असता, शेताबाहेर वासराला वन्यप्राण्याने खाल्ल्याचे दिसले तसेच वाघ दिसल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघाच्या चर्चेमुळे शेतकरी व मजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मजुरांनी शेतात कामावर येण्यास नकार दिल्याने शेतातील भाजीपाला कसा काढायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करून शेतकरी व गुराढोरांचा येणाऱ्या काळात जीव कसा वाचविता येईल. याकडे लक्ष देण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.

-------------

Web Title: A tiger hunts a cow near Karwar village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.