लोकलपेक्षा प्लॅटफार्मची तिकीट महाग; प्रवासी त्रस्त
By Admin | Updated: March 16, 2017 00:05 IST2017-03-16T00:05:57+5:302017-03-16T00:05:57+5:30
रेल्वेने प्रवास म्हटले की प्रत्येक क्षणाला पैसे मोजावे लागतात.

लोकलपेक्षा प्लॅटफार्मची तिकीट महाग; प्रवासी त्रस्त
अमरावती : रेल्वेने प्रवास म्हटले की प्रत्येक क्षणाला पैसे मोजावे लागतात. मात्र प्लॅटफार्मचे तिकिटासाठी १० रुपये तर अमरावती- बडनेरा लोकलने प्रवास करण्यासाठी केवळ पाच रुपये मोजावे लागते. त्यामुळे प्लॅटफार्मपेक्षा लोकलने प्रवास करणे बरा, असे म्हणण्याची वेळ रेल्वे प्रवाशांवर आली आहे.
रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्लॅटफार्मवर जायचे असल्यास त्याकरिता १० रुपये तिकीटचे दर आकारले आहे. अमरावतीत तीन तर बडनेऱ्यात चार प्लॅटफार्म आहेत. या दोनही रेल्वे स्थानकावरुन लोकलसह देशभरातील लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावतात. रेल्वे नियमानुसार प्लॅटफार्म तिकिट घेवूनच स्थानकावर प्रवेश करता येते. अन्यथा विनातिकिट प्रवास केल्याप्रकरणी संबंधिताना दंडात्मक कारवाईच्या सामोरे जावे लागते. त्यामुळे नातेवाईक अथवा मित्र हे रेल्वेने बाहेरगावी प्रवासाला जात असताना त्यांना प्लॅटफार्मवर सोडावयास जाताना न विसरता प्लॅटफार्म तिकिट घ्यावे लागते. परंतु ही संख्या जर जास्त असली तर प्रती व्यक्ती १० रुपये प्रमाणे प्लॅटफार्म तिकिटांचे मोजावे लागते.
परिणामी आता नातेवाईकांना प्लॅटर्फामवर सोडण्यासाठी जाताना जरा जपूनच विचार करावा लागणार आहे, असा प्रसंग रेल्वेने प्रवाशांवर आणला आहे. तर दुसरीकडे अमरावती- बडनेरा हा १० किमीचा प्रवास करण्यासाठी लोकल गाडीचे तिकीट केवळ पाच रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता बहुतांश नागरिक हे नातेवाईकांना गाडीवर सोडावयास जाताना प्लॅटफार्मऐवजी अमरावती- बडनेरा लोकलचे तिकीट घेवूनच स्थानकावर प्रवेश करीत असल्याचे चित्र आहे. दर वाढल्याने प्लॅटफार्मचे तिकीट हे नाममात्र ठरत आहे. लोकलपेक्षा प्लॅटफार्मचे तिकीट महागल्याने रेल्वे प्रशासनाच्या महसूल वाढीवरही परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)
आजपासून पुणे साप्ताहिक समर स्पेशल धावणार
अमरावती- पुणे समर स्पेशल साप्ताहिक रेल्वे गाडी ही उद्या १६ मार्चपासून धावणार आहे. खा. आनंदराव अडसूळ यांच्या प्रयत्नाने ही गाडी सुरु झाली असून ती कायम राहावी, यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सुरु आहे. अमरावती- पुणे (गाडी क्र. ११२१३) वातानुकुलीत ही कायमस्वरुपी गाडी सुरु करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उन्हाळी विशेष साप्ताहिक गाडी क्र. ०२०१३ सुरु करण्यात आली आहे. अमरावती -पुणे (गाडी क्र. ११२१३-११२१४) ही साप्ताहिक सुरु करण्यासाठी रेल्वे बजेटच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आली आहे. अमरावती- पुणे ही साप्ताहिक गाडी अमरावतीहून सायंकाळी ६.३५ मिनीटांनी सुटणार असून पुणे येथे सकाळी ७.४० वाजता पोहचेल. बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड अशी धावणार आहे. या गाडीत एक डबा प्रथमश्रेणी, चार एसी सेकंड, ९ एसी तृतीयश्रेणी असे राहणार आहेत.
प्लॅटफार्मचे तिकीट दर १० रुपये आकारणीचा निर्णय हा रेल्वे बोर्डाचा आहे. यात स्थानिक कोणतेही हस्तक्षेप नाही. किंबहुना उत्सव, गर्दीच्या प्रसंगी प्लॅटफार्मचे तिकीट २० रुपये दराप्रमाणे आकारणी करता येते.
- डी. व्ही. धकाते
आरक्षण पर्यवेक्षक, अमरावती