धारणी तालुक्यात नदी-नाल्यांना महापूर
By Admin | Updated: July 13, 2016 01:23 IST2016-07-13T01:23:46+5:302016-07-13T01:23:46+5:30
तालुक्यातील प्रमुख नदी-नाल्यांना मागील २४ तासांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महापूर आला आहे.

धारणी तालुक्यात नदी-नाल्यांना महापूर
श्यामकांत पाण्डेय धारणी
तालुक्यातील प्रमुख नदी-नाल्यांना मागील २४ तासांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महापूर आला आहे. नदी-नालाकाठावरील शेकडो हेक्टर शेतातील पीक पाण्यात बुडाल्याने ओला दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यातील प्रमुख नद्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास १०० गावांचा धारणी मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
तालुक्यातील सिपना व गडगा या प्रमुख नद्यांना महापूर आले आहे. सोमवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांत घरांची पडझड झाली. सिपना नदीवर दिया गावाजवळील पुलावरून १० फूट पाणी वाहत असल्याने उकुपाटी, धारणमहू, ढाकरमल, निरगुडी, चेथर, केकदा, चटवाबोड, काटकुंभ, बुलुमगव्हाण, कसाईखेडा, भोंडीलावा, बैरागड, कुटंगा, रंगुबेली, हरदा, सावलखेडा या गावांचा संपर्क तुटला आहे.
सिपना नदीवर उतावली गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने पोहरा, हरदोली, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, चिपोली, पाटीया, तांगडा, आठनादा या गावांचा रस्ता बंद आहे. दुनी जवळील अलई नाल्यावरून पूर वाहत असल्याने दुनी, बाजारढाणा, काकरमल या गावांचा संपर्क तुटला आहे. गडगा नदीला रोहणीखेडा गावाजवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने रोहणीखेडा, दाबीदा, अंबाडी, नागुढाणा, खारी, झिल्पी, साद्राबाडी, गौलानडोह, सुसर्दा, राणापीसा, लाकटू, डाबका, सावलीखेडा, नागझीरा, धुळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, दादरा, भंवर, रेहट्या, नारदु, गोलई, शिवाझीरी या गावांचा संपर्क तुटला आहे.