चांदूरबाजार तालुक्यात वादळाचा कहर
By Admin | Updated: June 7, 2017 00:13 IST2017-06-07T00:13:38+5:302017-06-07T00:13:38+5:30
मानसूनपूर्व वादळी पावसाने मंगळवारी चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांत नुकसान झाले.

चांदूरबाजार तालुक्यात वादळाचा कहर
एक जखमी : पांढरीत सर्वाधिक नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : मानसूनपूर्व वादळी पावसाने मंगळवारी चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांत नुकसान झाले. तालुक्यातील पांढरी, पाळा, भूगाव पिंपरी, शिरजगाव बंड येथे अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, पांढरी येथे कडूनिंबाचे झाड पडून सहा घरांचे व हनुमान मंदिराचे नुकसान झाले. या घटनेत माया गायकवाड ही महिला जखमी झाली. येथे गायकवाड कुटुंबातील सुरेश, नामदेवम देवानंद, श्रीकृष्ण, अशोक, सुधाकर यांचे घरांचे मोठे नुकसान झाले, तर देवीदास व उत्तम गायकवाड यांच्या घरावरील छत उडाले.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळाला भेट दिली. नुकसानग्रस्त कुटुंबांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली आहे.
तालुक्यातील भूगाव पिंपरी येथे दोन घराचे छत उडाले. वादळात घरांच्या भिंती पडून मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. शिरजगाव बंडमध्ये प्रियदर्शीनी वसाहतीमध्ये ललिता लढके यांच्या घरावर वडाचे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले.
शिरजगाव कसबा येथे लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळीच्या कारवर झाड कोसल्याचे सांगण्यात येते. वादळीमुळे मोठी वित्त हानी झाली असली तरी कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळेस्तोवर पंचनामा झाला नसल्याने नुकसानीचा आकडा मिळू शकला नाही.