चोरपावलांनी येतेय थंडी
By Admin | Updated: November 16, 2014 22:41 IST2014-11-16T22:41:45+5:302014-11-16T22:41:45+5:30
थंडी हा ऋतू कित्येकांना आवडणारा असतो. उन्हाळ्यातील तप्त झळा व पावसाची रिपरिप यापेक्षा हिवाळा आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हिवाळा हा उत्साहवर्धक ऋतू आहे. परंतु यंदा १५ नोव्हेंबर नंतरही

चोरपावलांनी येतेय थंडी
हवामान तज्ज्ञांचा अंदाज : आणखी दोन दिवस पावसाची शक्यता
अमरावती : थंडी हा ऋतू कित्येकांना आवडणारा असतो. उन्हाळ्यातील तप्त झळा व पावसाची रिपरिप यापेक्षा हिवाळा आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हिवाळा हा उत्साहवर्धक ऋतू आहे. परंतु यंदा १५ नोव्हेंबर नंतरही थंडीचे आगमन झालेले नाही. त्यामुळे ‘हिवाळाप्रेमी’ यंदा गुलाबी थंडीचा आनंद केव्हा मिळणार? याची प्रतीक्षा करीत आहेत. नोव्हेंबरमध्ये तरी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता नसून डिसेंबर-जानेवारीमध्ये मात्र थंडीची कसर भरून निघण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तोवर प्रतीक्षा करावी लागेल.
नोव्हेंबर हा मान्सून परतण्याचा काळ
गेल्या वर्षी उन्हाळा चांगलाच तापला. पाऊसही जोरदार झाला. त्यानंतर गोठवणारी थंडी पडली. यावर्षी उन्हाळ्यात सरासरी तुलनेत तापमान कमी होते. पाऊसही कमीच झाला. त्यामुळे आता थंडी देखील कमी पडणार असल्याची भविष्यवाणी काही कथित हवामान तज्ज्ञांकडून केली जात आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते नोव्हेंबर हा मान्सून परतण्याचा काळ असतो. परिणामी वातावरण ढगाळ असते. यामुळे नोव्हेंबर महिन्यात फारशी थंडी नसतेच. मात्र डिसेंबर व जानेवारीत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
डिसेंबर, जानेवारी गारठणार
भारताच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमालय पर्वतरांगामुळे देशात पाऊस चांगला होतो आणि गारठून टाकणारी थंडी देखील पडत नाही. दक्षिणायनाच्या काळात सूर्य मकर वृत्ताकडे सरकतो. यामुळे उत्तरेकडून येणारे वारे विषुववृत्ताकडे वाहू लागतात. यामुळे गोठविणारी थंडी जाणवते. मात्र, या वाऱ्यांसाठी हिमालय अडसर ठरतो आणि देशात गुलाबी थंडी पसरते. यामुळे डिसेंबर व जानेवारी महिना सर्वाधिक थंडीचा महिना मानला जातो. यामुळे भारतात शितलहरीचे प्रमाण जानेवारीत सर्वाधिक असते. यानंतर उत्तरायण सुरु झाल्यावर पृथ्वी कर्कवृत्ताकडे २३.५ अंशांनी सरकत जाते. या कालावधीपासून उन्हाळ्याची चाहूल लागते.