गृहिणींनी घेतले चित्तथरारक अनुभव
By Admin | Updated: November 13, 2014 22:56 IST2014-11-13T22:56:07+5:302014-11-13T22:56:07+5:30
एरवी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या गृहिणींना लोकमत सखीमंचच्या पुढाकाराने आयोजित ‘साहस सहली’च्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेण्याचा योग आला. दोन दिवसांच्या या

गृहिणींनी घेतले चित्तथरारक अनुभव
‘सखी मंच’ची साहस सहल: रॉक क्लार्इंबिंग, इव्हिनिंग ट्रॅकची धम्माल
अमरावती : एरवी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या गृहिणींना लोकमत सखीमंचच्या पुढाकाराने आयोजित ‘साहस सहली’च्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेण्याचा योग आला. दोन दिवसांच्या या सहलीत सखींनी धम्माल आणि थरारक अनुभवांची शिदोरी गोळा केली. अनेक अर्थांनी ही सहल सखींसाठी चिरस्मरणीय ठरली.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आॅल राऊंडर अॅडव्हेंचर कॅम्प परिसरात ८ व ९ नोव्हेंबर रोजी महिलांनी इव्हिनिंग ट्रॅक, कॅम्प फायर, लॅडर क्लार्इंबिंग, आर्टिफिशियल वॉल क्लार्इंबिंंग, सनराईज फन एक्सरसाईज, हील ट्रेक, पक्षी निरीक्षण, वर्मा ब्रिज, फन गेम्स, बोटींग, पॅरेशुट रोप वे हुकिंग यांसारख्या चित्तथरारक प्रकारांचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. सखींनी बोटींगचाही मनमुराद आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात तंबू ठोकून राहण्याची मौजही या सहलीच्या निमित्ताने सखींना अनुभवता आली. क्षितिजापल्याड दडलेला सूर्य वर येतानाचे विहंगम दृष्य सखींनी डोळ्यांत साठवून घेतले. रात्रीच्या मुक्कामात शेकोटीभोवती फेर धरून विविध खेळांनी सहलीमध्ये रंग भरला.
निसर्गाची विविध रूपे अनुभवण्याची संधी या ‘साहस सहली’च्या निमित्ताने महिलांना मिळाली. वयाच्या मर्यादा विसरून महिलांनी या सहलीमध्ये अनेक साहसी प्रकार बिनदिक्कत हाताळले. स्वत:च्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची अनोखी संधी देखील सहलीमुळे आपल्याला मिळाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया महिलांनी दिली.
कधीही बाईकला हात न लावणाऱ्या सखींनी अॅडव्हेंचर कॅम्पमध्ये मॅन्स्टर बाईक स्वत: भन्नाट चालविली. संसार आणि संसारातील व्यस्त दिनचर्येतूून स्वत:करिता काढलेला वेळ या गृहिणींना आगळा आनंद देऊन गेला. सखीमंचद्वारे आयोजित ही सहल जीवनातील अनुभवांना अधिक समृध्द करणारी ठरली, असे मत सर्वच सखींनी व्यक्त केले. पुढच्या अशाच दमदार सहलीचे नियोजन करीतच सखींनी रामटेकला निरोप दिला. या सहलीकरिता ‘लोकमत’चे जयंत कौलगिकर, सखी मंचच्या स्वाती बडगुजर, शीतल चौहान, अपूर्व डाखोडे यांनी प्रयत्न केले.