जुळ्या शहरात पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा
By Admin | Updated: June 2, 2016 01:49 IST2016-06-02T01:49:09+5:302016-06-02T01:49:09+5:30
पावसाळा सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस शिल्लक असताना जुळ्या शहराच्या स्वच्छतेचे नियोजन पुरते कोलमडले आहे.

जुळ्या शहरात पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा
पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष : नदी-नाल्यांची साफसफाई नाही
सुनील देशपांडे अचलपूर
पावसाळा सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस शिल्लक असताना जुळ्या शहराच्या स्वच्छतेचे नियोजन पुरते कोलमडले आहे. पालिकेकडून नदी-नाल्यांची स्वच्छता करणे तर सोडाच अद्याप रस्त्याच्या कडेला पडलेले कचऱ्याचे व खताचे ढिगारेदेखील उचलण्यात आलेले नाही.
सापन व बिच्छन नदीची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असते. मात्र, या सर्वच बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने संकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात कचरा व घाण कुजून त्यातून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
सांडपाणी वाहून नेण्यासाठी जुळ्या शहरातील काही भागात नाले काढण्यात आले आहेत. त्यांची वर्षातून एकदा सफाई करणे आवश्यक असते. वर्षभर या नाल्यांमध्ये गाळ साचतो. या गाळावर वनस्पती उगवतात. काही दिवसांनी नाल्याचे संपूर्ण पात्रच वनस्पतींनी व्यापून जाते. अचलपूर शहरातील माळवेशपुरा, सिटी हायस्कूल, विदर्भ मिल कॉलनी तर परतवाडा येथे लाकूड बाजार परिसरासह असे नाले दृष्टीस पडतात. या उगवलेल्या वनस्पतींमुळे पाणी वाहून नेण्याची नाल्यांची क्षमता अवरूध्द होते. परिणामी पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो होतो व नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. यापूर्वीदेखील याच प्रकारामुळे वित्तहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाल्यातील घाण इतस्तत: पसरलेली असल्याने तेथे वराहांचा मुक्त संचार दिसून येतो. डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. कचरा उचलण्याच्या बाबतीतही पालिकेचे योग्य नियोजन नसल्याने शहरातील रस्त्यांलगत ठिकठिकाणी कचरा व खतांचे ढिग साचले आहेत. हाच कचरा पावसाच्या प्रवाहाने नाल्यांमध्ये पडतो आणि पाणी अडविले जाते.