धामणगावचे तीन हजार वारकरी विठ्ठलाच्या दारी
By Admin | Updated: July 27, 2015 00:27 IST2015-07-27T00:27:41+5:302015-07-27T00:27:41+5:30
गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा उभा टिळा व हातात टाळ घेऊन तालुक्यातील तीन हजार वारकरी रविवारी पहाटे विठ्ठलाच्या दारी वैकुंठात पोहोचले आहेत.

धामणगावचे तीन हजार वारकरी विठ्ठलाच्या दारी
आषाढी एकादशी : ४० वर्षांपासूनची वारीची परंपरा
धामणगाव (रेल्वे) : गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा उभा टिळा व हातात टाळ घेऊन तालुक्यातील तीन हजार वारकरी रविवारी पहाटे विठ्ठलाच्या दारी वैकुंठात पोहोचले आहेत. मागील चाळीस वर्षाच्या वारीची परंपरा आजही तालुक्यात कायम आहे़
धामणगाव तालुका शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रक्रमावर आहे़ तालुक्यात ३७० पुरूष तर २४२ महिला भजनी मंडळे आहेत़ वारकरी संप्रदायही मोठ्या प्रमाणात रूक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील पालखी सोहळ्यात तालुक्यातील वारकरी दरवर्षी सहभागी होतात़ तर सहा दिवसांपासून विविध बस, रेल्वेने प्रवास करीत पंढरपुरात हे वारकरी पोहोचतात़ पंढरीची वारी ही आपल्या जिवनातील निष्ठा आहे़ असा मनी भाव ठेवून तालुक्यातील वारकरी वारीची अनुभूती घेतात़
तालुक्यातील निंभोरा बोडका येथील रामदास डुबे यांनी वारीला जाण्याची सुरूवात चाळीस वर्षापूर्वी केली होती़ आज त्या गावातील ७५ युवक वैकुंठात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात़ अशोकनगर येथील विठ्ठल राजणकर हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात़ दरवर्षी विठ्ठल रूक्मिणी भजनीमंडळाच्या माध्यमातून ५० महिला-पुरूष पंढरपूरला जातात. वारीची परंपरा देवगाव, तळेगाव दशासर, विरूळ रोंघे, जळगाव आर्वी, जुना धामणगाव, अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, निंभोरा राज, भातकुली, या गावात आहे़ येथील वृध्द पुरूषच नव्हेतर नवयुवकांनी वारीची पताका आपल्या हातात यावर्षीपासून घेतली आहे़ (तालुका प्रतिनिधी)