तीन शिक्षिकांची वेतनवाढ रोखली
By Admin | Updated: September 30, 2015 00:25 IST2015-09-30T00:25:28+5:302015-09-30T00:25:28+5:30
महापालिकेच्या रहाटगाव येथील शाळेच्या तीन सहायक शिक्षिकांनी निवडणूक संदर्भातील कामे नाकारल्याप्रकरणी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

तीन शिक्षिकांची वेतनवाढ रोखली
निवडणूक कामाला नकार : महापालिका आयुक्तांची कारवाई
अमरावती : महापालिकेच्या रहाटगाव येथील शाळेच्या तीन सहायक शिक्षिकांनी निवडणूक संदर्भातील कामे नाकारल्याप्रकरणी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त पत्राच्या आधारे करण्यात आली आहे.
सन २०१२ मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महापालिका प्रभाग क्र. ६,७ व ८ मधील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे काम या तीनही सहायक शिक्षिकांना सोपविण्यात आले होते. मात्र, या तीनही शिक्षिकांनी मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश स्वीकारले नव्हते.
ही बाब तत्कालीन आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला कळविली होती. विधानसभा, लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर निवडणूकविषयी कामे नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. किंबहुना ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची कामे नाकारली, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सहायक शिक्षिका विद्या मालपे, प्रेमलता शंभरकर व मंजू वानखडे यांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या आदेशाची प्रत सामान्य प्रशासन विभागाने या तिनही सहायक शिक्षिकांना बजावली आहे.
शिक्षण विभाग शुध्दीकरणासाठी प्रयत्न
महापालिकेचा शिक्षण विभाग सतत चर्चेत राहात असताना या विभागाचा कारभार सुधारावा, यासाठी आयुक्त गुडेवार यांनी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी वाकोडे यांच्याकडे या विभागाची धुरा सोपविली आहे. शिक्षकांची अंतर्गत भांडणे, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेपातून हा विभाग मुक्त केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळेतील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांना त्यांनी कानमंत्र दिला आहे. त्यानुसार शाळांमध्ये शिक्षक कार्यरत आहे.
कामात हयगय केल्याप्रकरणी तीन सहायक शिक्षिकेची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून तसे पत्र होते. सामान्य प्रशासन विभागाने हा प्रस्ताव सादर केला होता.
- चंद्रकांत गुडेवार
आयुक्त, महापालिका.