बनावट पीआर कार्ड प्रकरणात तिघे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:54+5:302021-07-08T04:10:54+5:30
अमरावती : बनावट पीआर कार्ड बनवून कोट्यवधींच्या भूखंडाचा परस्पर विक्री व्यवहाराचे प्रकरण, नियमबाह्य कामकाज व अपहाराच्या घटना निदर्शनास आल्याच्या ...

बनावट पीआर कार्ड प्रकरणात तिघे निलंबित
अमरावती : बनावट पीआर कार्ड बनवून कोट्यवधींच्या भूखंडाचा परस्पर विक्री व्यवहाराचे प्रकरण, नियमबाह्य कामकाज व अपहाराच्या घटना निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी स्वप्निल उंबरकर व योगेश शिरभाते तसेच मुख्य सहायक अविनाश दशरथकर यांचे निलंबन करण्यात आले. तसेच शिरस्तेदार अर्चना चव्हाण यांची विभागीय चौकशी सुरू आहे, तर भूमापक जे. एस. दुबळे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. स्वप्निल उंबरकर व योगेश शिरभाते यांच्यावर फौजदारी कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपअधीक्षक भूमी अभिलेख अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील नझूल शीट प्लॉटबाबत होणारे फेरफार, फेरफार झाल्यानंतर मिळकत पत्रिका तयार करणे, मिळकत पत्रिका वितरण करणे, मिळकत पत्रिकेकरिता आकारण्यात येत असलेले शासकीय शुल्क, फेरफार करताना संबंधित पक्षकारांना कोणतीही सूचना न देता फेरफार प्रमाणित करणे, बनावट आखीव पत्रिका तयार करून वितरित करणे, तसेच आकारण्यात येणारे शुल्क चलानद्वारे शासकीय खजिन्यात जमा न करता अपहार करणे आणि नियमबाह्य कामकाज होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकरणांपासून जनतेची फसवणूक टाळण्यासाठी मालमत्ता मिळकत पत्रिकेचे वितरण ऑनलाईन पध्दतीने महाभूलेख या संकेतस्थळावरून करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल तथा पदसिध्द भूमीअभिलेख उपसंचालक शैलेश नवाल यांनी दिले आहे. कॅम्प परिसरातील एक भूखंडधारक महिलेला अंधारात ठेवून दुसराच व्यक्ती मालक म्हणून उभा करण्यात आला होता. बनावट पीआर कार्ड बनवून हा विक्री व्यवहार करण्यात आला होता.