खासगी जागेवरील तीन आरक्षण रद्द
By Admin | Updated: May 9, 2015 00:19 IST2015-05-09T00:19:47+5:302015-05-09T00:19:47+5:30
येथील राजापेठ स्थित गोपाल टॉकीजसमोर व्यापारी संकुल तर बडनेरा पाचबंगला परिसरात फुकटनगर येथे ..

खासगी जागेवरील तीन आरक्षण रद्द
प्रशासकीय विषय : महापालिका स्थायी समितीत मंजुरी
अमरावती : येथील राजापेठ स्थित गोपाल टॉकीजसमोर व्यापारी संकुल तर बडनेरा पाचबंगला परिसरात फुकटनगर येथे हायस्कूल, दवाखान्याचे खासगी जागेवर असलेले आरक्षण गोठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या निर्णयाला स्थायी समितीत शुक्रवारी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करुन लोकवस्ती निर्माण केली आहे, हे विशेष.
महापालिका स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सभापती विलास इंगोले यांच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी सुनीता भेले, योजना रेवस्कर, दिगंबर डहाके, अजय गोंडाणे, भारत चव्हाण, वंदना हरणे, सारीका महल्ले, नीलिमा काळे, राजेंद्र तायडे, कुसूम साहू, कांचन उपाध्याय आदी सदस्य उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने सहायक संचालक नगररचना विभागाने बडनेरा मौजे सर्वे क्र. २४७/३ मध्ये ०.२५ हेक्टर आर इतक्या वल्लभदास सिकची यांच्या मालकीच्या खासगी जागेवर असलेले हायस्कूल, दवाखान्याचे आरक्षण गोठविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. जा जागेवर लोकवस्ती वसलेली असून येथे मुलभूत सोयी सुविधा प्रशासनाने पुरविल्या आहेत. ही वस्ती अतिक्रमित असली तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून ती हटविता येणे शक्य नाही, असे एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांनी स्थायी समितीत सांगितले. शेकडो नागरिकांनी या वस्तीत घरे बांधून वास्तव्य सुरु केले आहे. त्यामुळे या खासगी जागेवर असलेल्या आरक्षणाची जागा संपादित न करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थायीने मान्यता दिली. तसेच राजापेठ येथील सर्वे क्र. १९७ अंतर्गत खासगी जागेवर व्यापारी संकुलाचे आरक्षणदेखील गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जागा नरेश साहू नामक व्यक्तीची होती. या आरक्षणाची जागा सुद्धा संपादन न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतसेच स्थानिक बिच्छू टेकडी येथे पेव्हिंग ब्लॉक बसविण्याला मंजुरी दिली. दर कराराची कामे आयुक्तांनी निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव परत पाठविला. यासंदर्भात सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याचे ठरविले आहे. महापालिका शाळामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेषासोबत जोडे, पायमोजे, टाय, बेल्ट साहित्य खरेदीला मंजुरी देण्यात आली. ताजनगर येथील शाळेत बालवाडीची जागा महिला व बाल कल्याण विभागाला भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला. अग्निशमन विभागात नवीन यंत्र सामग्री खरेदीला मंजुरी देण्यात आली. उपायुक्त हजर नसल्याने सदस्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)
खासगी जागांवरील आरक्षित जागा संपादन न करण्याचा निर्णय हा प्रशासनाचा असल्याने तो स्थायी समितीने क्षणात मंजूर केला. हायस्कूल, दवाखाना, व्यापारी संकुलाच्या जागांवर काही वर्षांपासून गरीब, सामान्य कुटुंबांची घरे बांधली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. त्यानुसार मानवतेचा दृष्टिकोन ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- विलास इंगोले,
सभापती, स्थायी समिती.