डोळ्यात मिरचीपूड फेकणारे तिघे ताब्यात
By Admin | Updated: July 23, 2016 00:44 IST2016-07-23T00:44:17+5:302016-07-23T00:44:17+5:30
एका १७ वर्षीय मुलीवर प्रेम जडले आणि त्यांनी तिच्या शाळेत चकरा मारण्यास सुरुवात केली.

डोळ्यात मिरचीपूड फेकणारे तिघे ताब्यात
अल्पवयीनांचा प्रताप : डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनीतील घटना
अमरावती : एका १७ वर्षीय मुलीवर प्रेम जडले आणि त्यांनी तिच्या शाळेत चकरा मारण्यास सुरुवात केली. हा प्रकार शिक्षिकेच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला पकडून एक थापड लगावली. हा प्रकार सहन न झाल्याने त्या अल्पवयीनाने शिक्षिकेचा वचपा काढण्याचे ठरविले. शिक्षिकेला अद्दल घडविण्यासाठी त्याने आणखी दोन मित्रांना सोबत घेऊन शिक्षिकेला मार्गात गाठले आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयींना ताब्यात घेतले आहे.
शहरातील एक अल्पवयीन मुलाला दहावीत शिकणाऱ्या मुलीवर पे्रम जडले. त्याने त्या मुलीचा पाठलाग करून शाळेत चकरा मारणे सुरु केले. काही दिवसातच हा प्रकार शाळेतील शिक्षिकेच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी एक दिवस त्या अल्पवयीनाला थांबवून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजून घेण्याच्या स्थितीत नसल्याचे पाहून शिक्षिकेने त्याच्या श्रीमुखात लगावली. मात्र, शिक्षिकेने थापड लगावल्याचा राग मनात असल्याने आपण शिक्षिकेला अद्दल घडवायची असा विचार अल्पवयीनाने केला. त्याने दोन मित्रांच्या मदतीने योजना आखली आणि एका दुचाकीवर तिघांनी शाळा गाठली. शाळा सुटताच ती शिक्षिका त्यांच्या दुचाकीने निवासस्थानी जात होत्या. दरम्यान तिन्ही अल्पवयींनानी चेहऱ्याला दुपट्टा बांधून शिक्षिकेला मार्गात थांबविले आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तेथून पसार झाले. या प्रकाराबद्दल शिक्षिकेने गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.