नगराध्यक्षांसह तिघांचे नगरसेवकपद धोक्यात ?

By Admin | Updated: May 19, 2016 00:07 IST2016-05-19T00:07:11+5:302016-05-19T00:07:11+5:30

नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे.

Three municipal corporators threatened? | नगराध्यक्षांसह तिघांचे नगरसेवकपद धोक्यात ?

नगराध्यक्षांसह तिघांचे नगरसेवकपद धोक्यात ?

आज निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणार
चांदूरबाजार : नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे. प्रहार गटनेत्याकडून पक्षादेश झुगारल्याचा आरोप करण्यात आला असून आरोप सिध्द झाल्यास तिघांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
याबाबत जिल्हाधिकारी गुरूवार १९ मे रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांविरूध्द निर्णय दिल्यास त्यांना नगरसेवक पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यामुळे नांगलिया यांचे नगराध्यक्षपद देखील पणास लागले आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उत आला आहे.
२९ आॅक्टोबर २०१५ रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपरोक्त तिघांनी प्रहार पक्षाचा पक्षादेश झुगारून अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उघड बंड पुकारले होते. यावेळी मनीषा नांगलिया या प्रहारच्या बंडखोर अध्यक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांना प्रहारचे तत्कालीन सदस्य, नगरसेवक तिरमारे व लंगोटे यांनी सहकार्य केले होते. त्यामुळे या तिघांनीही पक्षादेश (व्हीप) झुगारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
प्रहारच्या पराभूत अधिकृत उमेदवार सुनीता गणवीर व गटनेते अ.रहेमान शे.इब्राहिम यांनी या तिन्ही नगरसेवकांविरोधात तक्रार करून त्यांना नगरसेवकपदावरून निष्कासित करण्याचे अपील २९ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले होते. याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी दोन्ही पक्षांना गुरूवार १९ मे ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १८६५ मधील, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अटी व नियमांतर्गत कलम ७ नुसार हे अपील सादर करण्यात आले होते. अपिलावरील निर्णय तुर्तास तरी गुलदस्त्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बंडखोर प्रहार नगरसेवकांच्या विरोधात गेल्यास तो त्यांच्याकरीता जबरदस्त हादरा असेल. या प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी तो निर्णय तालुकाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे हे निश्चित.
चांदूरबाजार शहर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ला आहे. येथील कुठलीही निवडणूक असो, ती जिल्ह्याच्या पटलावर गाजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे येथील नगराध्यक्षांवर केलेला आरोप कितपत सत्य आहे, हे येणारी वेळच सांगणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three municipal corporators threatened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.