एलईडी दिवे कंत्राटात तीन कोटींचा फटका !

By Admin | Updated: February 12, 2016 00:51 IST2016-02-12T00:51:35+5:302016-02-12T00:51:35+5:30

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एलईडी दिवे लावण्यासंदर्भात नवीन दरसूची, नियमावली लागू केली .

Three lacs of LED lights contract contract! | एलईडी दिवे कंत्राटात तीन कोटींचा फटका !

एलईडी दिवे कंत्राटात तीन कोटींचा फटका !

आयुक्तांना ठेवले अंधारात : शासन निर्णयाला बगल, अभियंत्यांचे संगनमत
अमरावती : शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एलईडी दिवे लावण्यासंदर्भात नवीन दरसूची, नियमावली लागू केली असताना महापालिकेत जुन्याच दराने निविदा प्रक्रिया राबवून एलईडी दिवे लावण्याचा कंत्राट सोपविला आहे. परिणामी महापालिका प्रशासनाला तीन कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याची माहिती आहे. हा प्रकार प्रकाश विभागाने आयुक्तांना अंधारात ठेवून केला आहे.
एलईडी दिवे लावण्याबाबत नवीन शासन नियमावली ३१ आॅक्टोबर २०१५ रोजी लागू करण्यात आली होती. शासन निर्णयात ३० टक्के कमी दराने एलईडी दिवे लावण्याबाबतचे सुस्पष्ट आदेश आहेत. असे असताना महापालिका प्रशासनाने पथदिव्यांवर एलईडी दिवे लावण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविली. जुन्याच दराने एलईडी दिवे लावण्याची निविदा काढून येथील जगदंबा व राधेय ईलेट्रिकल्स कंपनीला प्रत्येकी दीड कोटी या प्रमाणे तीन कोटी रुपयांची कामे करण्याचा पाच झोनमध्ये कंत्राट सोपविण्यात आला. ही निविदा प्रक्रिया संबंधित अभियंत्यांनी अडीच महिन्यांपर्यत खोळंबून ठेवली. शासनाने एलईडी दिवे लावण्याबाबत नवीन दरसूची दिली असताना जुन्याच दराने निविदा प्रक्रिया राबविण्यामागे अर्थकारण असल्याचे बोलले जात आहे.
या गंभीर प्रकारापासून आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना अंधारात ठेवले आहे. खरे तर शासन आदेश प्राप्त होताच प्रकाश विभागाने एलईडी दिवे लावण्याबाबत पुनर्निविदा काढणे अपेक्षित होते. मात्र ज्या कंत्राटदारांना एलईडी दिवे लावण्याचा कंत्राट सोपविण्यात आला आहे, त्या कंत्राटदारांच्या हातून अभियंत्यांनी विना आदेशाचे अनेक कामे करुन घेतली आहेत.
आयुक्तांचे आदेश न घेता पथदिवे उभारणे, दिवे लावणे आदी विद्युत बाबतची कामे केली आहेत. महापालिका प्रकाश विभागात या देयकांबाबत आजही अंधार असल्यामुळे जास्त भानगडी वाढू नये, यासाठी जुन्याच दरात जगदंबा व राधेय ईलेट्रिकल्स कंपनीला कंत्राट सोपविण्यात आल्याची माहिती आहे.
स्पर्धा का केली नाही?
शहरात एलईडी दिवे लावण्याबाबत नव्याने निविदा प्रक्रिया राबवून स्पर्धा केली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जुने दरसुचीनुसार निविदा प्रक्रिया प्रारंभ होत असताना शासनाने एलईडी दिव्यांबाबत नवीन नियमावली लागू केली. त्यानुसार एलईडी दिवे लावण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवून स्पर्धेतून कंत्राटदार निश्चित करणे आवश्यक होते. मात्र प्रकाश विभागाने जुन्याच वाढीव दरात एलईडी दिवे लावण्याचा कंत्राट सोपविला आहे.

‘बी अ‍ॅन्ड सी’ने ३० टक्के कमी दरात सोपविले कंत्राट
येथील बांधकाम विभागाने शेगाव नाका परिसरात पथदिव्यांवर एलईडी दिवे लावण्याबाबत नवीन शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन ३० टक्के कमी दराने कंत्राट सोपविल्याची माहिती आहे. शहरात ‘बी अ‍ॅन्ड सी’ने दिवे लावण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ३० टक्के रक्कमेची बचत झाली. मात्र महापालिका प्रशासनाने जुन्याच दरात निविदा प्रक्रिया राबविण्याचे धोरण कायम ठेवून दोन कंत्राटदारांना अभियंत्यांनी तीन कोटी रुपये देण्याची रणनिती आखली आहे.

Web Title: Three lacs of LED lights contract contract!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.