तीन ग्रामपंचायतीत लक्षावधींची अफरातफर
By Admin | Updated: May 15, 2016 23:57 IST2016-05-15T23:57:59+5:302016-05-15T23:57:59+5:30
जिल्ह्यातील पोहरा, पिंपळखुटा आणि नांदगाव पेठ या तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपयांची अफरातफर करण्यात आली आहे.

तीन ग्रामपंचायतीत लक्षावधींची अफरातफर
ग्रामसेवकांसह पाच जणांविरुध्द गुन्हे : पोहरा, पिंपळखुटा, नांदगाव पेठ येथील प्रकार
अमरावती : जिल्ह्यातील पोहरा, पिंपळखुटा आणि नांदगाव पेठ या तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपयांची अफरातफर करण्यात आली आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात ग्रामसेवकासह अन्य चार जणांविरुध्द भादंविच्या कलम ४०९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र हरिभाऊ देशमुख यांनी तक्रार नोंदविली आहे.
अमरावती तालुक्यातील पोहरा आणि पिंपळखुटा या दोन ग्रामपंचायतींमध्ये एस.आर.खानंदे हे २००४ ते २००६ या कालावधीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी निधीची अफरातफर केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशी व अहवालानंतर गटविकास अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी खानंदे यांच्याविरुध्द फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोहरा ग्रामपंचायतीमधील १२ हजार १४ रुपये आणि पिंपळखुटा येथील १० हजार ४९४ अशा एकूण २२ हजार ६४० रूपयांच्या निधीची खानंदे यांनी अफरातफर केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
नांदगाव पेठ ग्रामपंचायतीमध्ये अपहार
पोहरा आणि पिंपळखुटा ग्रामपंचायतीप्रमाणेच अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ ग्रामपंचायतीमध्ये निधीची मोठी अफरातफर करण्यात आली आहे. आर.डब्ल्यू.लिखिल, एस.पी. देशमुख,एच.एम. उताणे आणि एस.एस.सगणे या चौघांनी ग्रामपंचायत निधीची अफरातफर केली. सन १९९७ ते २०१० या कालावधीत कार्यरत उपरोक्त चार ग्रामसेवकांनी हा आर्थिक अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लेखा परीक्षणाच्या खास अहवालानुसार खर्चाच्या रक्कमेमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर प्राथमिक चौकशीत मोठ्या निधीची अफरातफर झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून चौघांविरुध्द नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.