तीन दिवसीय चिखलदरा पर्यटन महोत्सव
By Admin | Updated: January 20, 2015 22:29 IST2015-01-20T22:29:54+5:302015-01-20T22:29:54+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय, पर्यटन विकास महामंडळ, चिखलदरा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवसीय चिखलदरा पर्यटन महोत्सव
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय, पर्यटन विकास महामंडळ, चिखलदरा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखलदरा येथील पोलीस स्टेशनसमोरील मैदानात आयोजित चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी आमदार प्रभूदास भिलावेकर उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे आमदार सुनील देशमुख, पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाच्या सचिव वल्सा नायर- सिंह, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी, जिल्हाधिकारी किरण गित्ते हे राहणार आहेत.
उद्घाटनाच्या दिवशी रांगोळी रेखाटन, प्रभातफेरी उत्सव, आदिवासी नृत्य, विविध कला दालनाचे उद्घाटन, विशेषांकाचे प्रकाशन, बांबू शिल्प कार्यशाळेचे उद्घाटन, फोटो प्रदर्शनीचे उद्घाटन, विविध वस्तू विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन केले जाणार आहे. विविध साहसी उपक्रमांतर्गत पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायंबीग, हॉट एअर बलुन, पदभ्रमण, हत्त, घोडा व उंट सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच खंजेरी भजन स्पर्धा, मशाल महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमात विदर्भ संध्या हा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
२४ जानेवारी रोजी लोकनृत्य स्पर्धा, विविध साहसी उपक्रम, खंजेरी भजन स्पर्धा, आदिवासी लोकनृत्य स्पर्धा, कला पथक, सांस्कृतिक कार्यक्रमात हास्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
२५ जानेवारी रोजी मेळघाट मॅरॉथान स्पर्धा, खंजेरी भजन स्पर्धा, विविध साहसी उपक्रमात पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायबिंग, हॉट एअर बलुन, पदभ्रमण, हत्ती, घोडा व उंट सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. समारोपीय कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभ केला जाईल. या पर्यटन महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. गुलाबी थंडीत होणाऱ्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.