तीन दुग्ध केंद्रांवर धाडी
By Admin | Updated: August 4, 2016 00:02 IST2016-08-04T00:02:10+5:302016-08-04T00:02:10+5:30
शहरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त व अप्रमाणित दूधविक्री होत आहे. हा प्रश्न अनेकवेळा लोकमतने लोकदरबारात मांडला.

तीन दुग्ध केंद्रांवर धाडी
एफडीएची कारवाई : सहा नमुने तपासणीला
अमरावती : शहरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त व अप्रमाणित दूधविक्री होत आहे. हा प्रश्न अनेकवेळा लोकमतने लोकदरबारात मांडला. कमी दर्जाच्या दूधाचे सेवन केल्याने लहान मुलांसह मोठ्यांचेही आरोग्य धोक्यात आले असून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शहरातील तीन ठिकाणी तपासणी करून दूधाचे नमुने तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
ही कारवाई सोमवारी शहरातील विविध भागात करण्यात आली आहे. शहरामध्ये अनेक दूध डेअऱ्यांमध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री सुरु आहे. यातून लाखोंची कमाई करण्याचा गोरखधंदा त्यांनी सुरु केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करुन काही ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करून दूध तयार केले जाते. अनेक ठिकाणच्या दुधामध्ये ‘सॉलिड नोट फॅट’चे प्रमाण निर्धारित मानकानुसार प्रमाणित नसते. वास्तविक दूधाची विक्री करणाऱ्यांनी अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार दूधाची विक्री करायला हवी. पण, शहरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याची माहिती आहे. ही बाब अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळली. हे भेसळयुक्त दूध मानवी शरीराला हानिकारक तर नाही ना? घातक सोड्याचे मिश्रण करून तर दुधाची विक्री होेत नाही ना, हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी दुधाचे नमुने घेतले. यामध्ये राजकमल चौकातील रोहित दूध डेअरीमध्ये तपासणी करण्यात आली. येथून म्हशीच्या दुधाचा नमुना, फुलक्रिम मिल्कचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.येथीलच यशोदा डेअरीतून पाकिटबंद दूध, होलसम म्हशीचे दुधाचा नमुना घेण्यात आला. जुन्या कॉटन मार्केट जवळील निळकंठ एजन्सीजमधून सुरभी ब्रांडचे टोन्ड मिल्क, क्लासिक ब्रॅण्डचे प्रमाणित दूध जप्त करून ते तपासणीसाठी येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत मंगळवारी पाठविण्यात आले. ही कारवाई एफडीएचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे, नीलेश ताथोड यांनी केली.
दुधात शरीराला हानिकारक असलेला धुण्याचा सोडा मिसळलेला आहे काय?, हे तपासण्यासाठी नमुने जप्त करण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
- मिलिंद देशपांडे
सहायक आयुक्त, एफडीए अमरावती.