अमरावती : देशीकट्टे विक्री करणाऱ्यासह एका खरेदीदाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी गाडगेनगर हद्दीतून अटक केली. निखिल विजय टिकले (२३ रा. अर्जुननगर), रोशन अशोक हिवसे (२८ रा. चिचफैल, ह.मु. दिलखुश अपार्टमेंट सर्किट हाऊस) व जयंत विठ्ठल बंदिवान (३३ रा. हमालपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून दोन देशीकट्टे, दोन जिवंत काडतुस, तर एक वापरलेले काडतूस जप्त केले. हा देशीकट्टा कुठून आणला, याबाबत आरोपींची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. गाडगेनगर हद्दीतील एका ठिकाणी देशी बनावटी कट्टे विक्रीच्या उद्देशाने आणले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी धाड टाकून आरोपींना अटक केली. पोलिसांनी निखिल टिकलेकडून एक देशी बनावटीचे पिस्टल एका मॅगझिनसह ३५ हजार, रोशन हिवसेच्या ताब्यातून एक वापरलेल्या काडतुसची पितळी नळी आणि जयंत बंदिवानकडून एक देशी कट्टा मॅग्झिनसह ३५ हजार व दोन जिवंत काडतूस असा एकूण ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, पोलीस हवालदार राजेंद्र काळे, राजेश राठोड, देवेंद्र कोठेकर, गजानन ढेवले, सैय्यद इमरान, चेतन कराडे, विशाल वाकपांजर व प्रशांत नेवारे यांनी केली.
दोन देशीकट्ट्यासह तीन काडतूस जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST