ब्रिटिशकालीन लोहा भंगारातून साकारले तीन पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:33+5:30
अमरावती जिल्ह्यातील अमरावती-अचलपूर-धारणी-बऱ्हाणपूर हा जुना मोगलकालीन व नंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचा रस्ता. या मार्गावर पेढी, पूर्णा आणि पिली नामक मोठ्या नद्यांवर ब्रिटिशांनी १८८३ मध्ये पूल बांधलेत. यात पूर्णा आणि पिली नदीवरील हे पूल सुपरस्ट्रक्चर ‘थ्री-टाईप स्टील-ट्रस’ पद्धतीचे होते. तसेच पेढी नदीच्या पुलावर कास्ट आयर्नचे ओतीव असे सुरेख रेलींग होते.

ब्रिटिशकालीन लोहा भंगारातून साकारले तीन पूल
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : ब्रिटिशकालीन लोखंडाच्या भंगारातून जिल्ह्यात साकारल्या गेलेल्या तीन पुलांनी ‘जुनं ते सोनंच’ यावर शिक्कामोर्तब केले आहे. १३७ वर्षे जुने हे भंगार आहे. या भंगाराच्या वापरामुळे १७ वर्षांपूर्वी २ कोटी ६० लाखांची बचत झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अमरावती-अचलपूर-धारणी-बऱ्हाणपूर हा जुना मोगलकालीन व नंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचा रस्ता. या मार्गावर पेढी, पूर्णा आणि पिली नामक मोठ्या नद्यांवर ब्रिटिशांनी १८८३ मध्ये पूल बांधलेत. यात पूर्णा आणि पिली नदीवरील हे पूल सुपरस्ट्रक्चर ‘थ्री-टाईप स्टील-ट्रस’ पद्धतीचे होते. तसेच पेढी नदीच्या पुलावर कास्ट आयर्नचे ओतीव असे सुरेख रेलींग होते.
२००१-२००२ मध्ये या पुलांच्या रूंदीकरणासह मजबुतीकरणाचा विचार पुढे आला. यात पिली आणि पूर्णा नदीवरील पुलावर ३०० टन जुने ब्रिटिशकालीन भंगार लोखंड निघाले.
आसेगावलगतच्या पूर्णा नदीवरील पुलावरील काढल्या गेलेल्या २६.३० मीटर लांबीच्या सात लोखंडी गाळ्यांपैकी सहा लोखंडी गाळ्यांचा वापर, मेळघाटातील कळमखार गावाजवळील गडगा नदीवरील नव्या मोठ्या पुलाचे बांधकामाकरिता २००२-२००३ मध्ये केल्या गेला. यात २ कोटी ६० लाख रुपये अपेक्षित खर्चाचा हा पूल केवळ ५५ लाखांत बांधल्या गेला. केवळ सहा महिन्यांत, सहा गाळ्यांचा १५६ मीटर लांबीचा आणि ४.२५ मीटर रुंदीचा हा अस्तित्वात आलेला पूल आजही सुस्थितीत आहे.
पिली नदीवरील पुलावरील काढल्या गेलेल्या २५.३० मीटर लांबीच्या तीन लोखंडी गाळ्यांपैकी एक लोखंडी गाळा, पोहरा मार्गावरील भानखेडा (खुर्द) गावाजवळ खोलाड नदीवरील पुलाच्या बांधकामात वापरण्यात आला आहे. यात ३८ लाख अपेक्षित खर्चाचा हा पूल केवळ १३ लाख रुपयांत पूर्ण झाला. उर्वरित दोन गाळ्यांचा वापर वरूड तालुक्यातील ग्रामीण मार्गावर वावरूळी गावाजवळील नदीवरील पुलाच्या बांधकामात करण्यात आला आहे. यात ३५ लाखांची बचत झाल्याची माहिती आहे.
पेढी नदीवरील जुन्या पुलाच्या पॅरापेटचे निघालेले ओतीव रेलींग, अमरावती येथील विश्रामभवनाच्या आवार भिंतीला लावल्या गेले. त्यातून निघालेल्या दगडांचा वापर आवाराचे मुख्य प्रवेशद्वारात वापरले गेले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता धनंजय धवड, तत्कालीन कार्यकारी अभियंता एन. अे. मर्चंट व व्ही. बी. साळवे यांची व त्यांचे अधिनस्त उपविभागीय तसेच शाखा अभियंत्यांची कल्पकता यात उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या या कल्पकतेमुळे ब्रिटिशकालीन जुन्या ऐतिहासिक आठवणींचा ठेवा आजही शाबूत आहे. ब्रिटिशकालीन त्या भंगार लोखंडाला सोन्याचे मूल्य प्राप्त झाले आहे. १७ वर्षांपूर्वी वेळ आणि पैशाची बचत करीत जुन्या आणि नव्या संस्कृतीचा समन्वय साधत पूर्णत्वास नेल्या गेलेले हे तीनही पूल आजही लोकोपयोगी ठरले आहेत.