छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी, खंडणीची मागणी
By Admin | Updated: February 24, 2017 00:18 IST2017-02-24T00:18:53+5:302017-02-24T00:18:53+5:30
महिलेच्या हॅन्डबॅगमध्ये आढळलेल्या मोबाईलमधून तीचे खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागितल्याची

छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी, खंडणीची मागणी
दोन आरोपींना अटक : गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई
अमरावती : महिलेच्या हॅन्डबॅगमध्ये आढळलेल्या मोबाईलमधून तीचे खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघड झाली. याप्रकरणात गुन्हे शाखेने उज्वल अशोक गजभिये (२८) व सुशील भीमराव गयभिये (२४, दोन्ही राहणार माधान, चांदूरबाजार) या दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलीस सुत्रानुसार २९ डिसेंबर २०१६ रोजी शहरातील एका महिलेची हॅन्डबॅग फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरविली होती. यासंदर्भात तीने पोलिसांकडे तक्रार केली होती. तिच्या हॅन्डबॅगमध्ये मोबाईल व काही महत्त्वाची कागदपत्रे व ६०० रुपयांची रोख होती. १५ फेब्रुवारीला या महिलेला एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला व त्या इसमाने महिलेला तिचे खासगी छायाचित्रे व्हायरल न करण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागितली. या प्रकाराबद्दल त्या महिलेने गुन्हे शाखेचे एपीआय कांचन पांडे यांच्याशी संपर्क साधून आपबिती कथन केली. पांडे यांच्या चौकशीदरम्यान आरोपी हे चलाख असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान २२ फेब्रुवारीला पुन्हा त्या महिलेला एक कॉल आला. यावेळी पोलिसांनी या क्रमांकाचे लोकेशन घेतले असता हा कॉल चांदूरबाजार येथील एका कॉईन बॉक्सवरून आल्याचे त्यांच्या लक्षात आले व पोलिसांनी त्या कॉईन बॉक्सजवळ सापळा रचला. पोलीस हवालदार सहस्त्रबुद्धे व पोलीस शिपाई मनीष गवळी यांनी त्या कॉईन बॉक्सवर पाळत ठेवली व पुन्हा कॉल करण्यास आलेल्या त्या खंडणीबहाद्दरांना जागीच पकडले.
चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला सुद्धा अटक केली व त्यांचेजवळून मोबाईल, मेमरी कार्ड व दोन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, एपीआय कांचन पांडे, पीएसआय प्रवीण वेरुळकर, पोलीस शिपाई सुभाष पाटील, संग्राम भोजने, राजेश बहिरट यांनी केली. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३८४, ३८५, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या आरोपींजवळून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)