शहिदांना हजारोंची श्रद्धांजली
By Admin | Updated: September 26, 2016 00:40 IST2016-09-26T00:34:46+5:302016-09-26T00:40:13+5:30
औरंगाबाद : शहीद झालेल्या जवानांना लोकमत समूह आणि प्रोझोनतर्फे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोझोन मॉल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो देशभक्तांची पावले वळली.

शहिदांना हजारोंची श्रद्धांजली
औरंगाबाद : काश्मीरमधील उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना लोकमत समूह आणि प्रोझोनतर्फे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोझोन मॉल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो देशभक्तांची पावले वळली. शहीद जवानांना ‘प्रतीकात्मक शहीद स्तंभा’जवळ हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली अर्पण करण्यात आली. शांत वातावरण आणि देशभक्तीपर गीतांमुळे पूर्ण परिसर भावुक झाला होता.
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी दांगट, ब्रिगेडियर अनुराग विज व त्यांच्या पत्नी शीतल विज, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, भारत बटालियनचे समादेशक निसार तांबोळी, स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, कृउबाचे माजी सभापती पंकज फुलपगर, माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शहीद स्तंभा’ला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याप्रसंगी लोकमतचे संपादक सुधीर महाजन, सहायक उपाध्यक्ष संदीप बिष्णोई, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, लोकमत टाइम्सचे निवासी संपादक योगेश गोले, प्रोझोन मॉलचे सेंटरप्रमुख मोहम्मद अर्शद यांची उपस्थिती होती. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
देशवासीयांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. त्या भावनेने शहीद झालेल्या जवानांना ‘लोकमत’ तर्फे रविवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांसह विविध संस्था, संघटना, उद्योजक, शालेय विद्यार्थी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील औरंगाबादकरांनी सहभाग नोंदविला. जवानांप्रती असलेली श्रद्धा, भावना व्यक्त करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतरही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो देशभक्तांच्या रांगा लागलेल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद इंगळे यांनी केले.
क्षणचित्रे...
प्रोझोन मॉलच्या प्रांगणात दुपारी ४.३० वाजेपासूनच शहरवासीयांची गर्दी.
श्रद्धांजलीसाठी अनेकांची परिवारासह हजेरी.
शालेय विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष.
महाविद्यालयीन तरूणाईची लक्षणीय उपस्थिती.
ज्येष्ठांसह प्रत्येक स्तरातील व्यक्तींनी वाहिली श्रद्धांजली.
हजारो मेणबत्त्या प्रज्वलित.
देशभक्तीमय वातावरणात मानवंदना.
परिसरात घुमला ‘भारत माता की जय’चा जयघोष.
‘एसआरपीएफ ’च्या जवानांची शिस्तबद्ध आदरांजली.
मॉल परिसरातील वातावरण भावुक.
शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती.
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन.
महाराष्ट्रातील या वीरांना सलाम
उरी येथील लष्करी तळावर १८ सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. यामध्ये अमरावतीचे विकास जानराव उईके (२७), यवतमाळचे विकास जनार्दन कुडमेथे (३१), नाशिकचे संदीप सोमनाथ ठोक (२५) व साताऱ्याचे चंद्रकांत शंकर गलंडे (२९) हे चार वीर जवान महाराष्ट्राने गमावले. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरचे विकास उईके हे २००९ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुरड गावातील विकास कुडमेथे २००८ मध्ये लष्करात भरती झाले होते. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील खडांगळी गावचे जवान संदीप ठोक हे २०१४ मध्ये भरती झाले होते. तर सातारा जिल्ह्यातील जाशी (ता. माण) येथील शहीद जवान चंद्रकांत गलंडे हेदेखील शेतकरी कुटुंबातीलच होते. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या चार जवानांनी देशासाठी आपल्या जिवाची बाजी लावली. देश आणि देशवासीयांच्या सुरक्षेची जबाबदारी निभावताना या जवानांना वीरमरण आले.
लष्करी जवानांचा सहकुटुंब सहभाग
लष्करातील २५० जवानांनी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला हजेरी लावली. एसआरपीएफच्या ५० जवानांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
४यामध्ये १० वरिष्ठ, २५ कनिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. बिंद, बालमुकुंद अनभोरे यांच्यासह १०० हून अधिक पोलीस कॉन्स्टेबल व शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचीही यावेळी हजेरी होती. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, कैलास प्रजापती यांनी कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था सांभाळली.
‘स्टॉप टेररिझम’
‘चला, एक ज्योत पेटवू या, स्फुल्लिंग चेतवू या, उरीच्या शहिदांसाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी’ याची प्रचीती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. चाटे स्कूल, न्यू मॉर्डन इंग्लिश स्कूल, विवेकानंद अकॅडमी, मिनी मिरॅकल स्कूल या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पोस्टर्सद्वारे ‘थँक्यू सोल्जर्स’, ‘स्टॉप टेररिझम’ असा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक जण परिवारासह उपस्थित होते. तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती. एकमेकांना मेणबत्ती पेटविण्यास मदत करीत ‘ज्योत से ज्योत जला ते चलो’ ची अनुभूती दिली. मेणबत्ती पेटवून अनेकांनी श्रद्धेने शहीद स्तंभासमोर माथा टेकविला.