स्वफसवणुकीनंतर हजारोंना नाडवले
By Admin | Updated: July 2, 2016 23:59 IST2016-07-02T23:59:56+5:302016-07-02T23:59:56+5:30
नागपूर येथे भवानी ट्रेडर्सच्या संचालकांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगमधून हजारो बेरोजगारांची फसवणूक केल्याचा उघड झाला होता.

स्वफसवणुकीनंतर हजारोंना नाडवले
मल्टीलेव्हल मार्केटिंग : सूत्रधाराची कबुली
अमरावती : नागपूर येथे भवानी ट्रेडर्सच्या संचालकांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगमधून हजारो बेरोजगारांची फसवणूक केल्याचा उघड झाला होता. त्यामध्ये आरोपी उमेन्द्र जगेश्वर राय (२२) याचीही फसवणूक झाली होती. त्यानंतर त्याने अमरावतीत वैष्णवी एन्टरप्राइजेसच्या थाटत हजारो बेरोजगारांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू केला.
फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यकैय्यापुरा स्थित वैष्णवी एन्टरप्राईजेसने मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांची फसवणूक केल्याचे नुकतेच उघड झाले आहे.
याप्रकरणात अमरावती पोलिसांनी उमेन्द्र जगेश्वर राय याच्यासह त्याचा भाऊ सुरेंद्र जगेश्वर राम (२४,रा. दोन्ही राहणार भेडीया, औरंगाबाद, बिहार) व सुनील विजयसिंग गिरासे (२०,रा. धावडे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) यांना अटक करून त्यांच्या कार्यालयातून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना ७ जूलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता आर्थिक गुन्हे शाखा त्यांची सखोल चौकशी करीत आहे. दरम्यान चौकशीत उमेन्द्र याची नागपूरमध्ये मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्येच फसवणूक झाल्याने त्याने अमरावतीत हा गोरखधंदा सुरू केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
अमरावती : नागपूर शहरातील दत्तवाडी परिसरात भवानी ट्रेडर्सचे संचालक मुद्रीका प्रसाद, शिवाजी थोरात व अजित केसरी या तिघांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करून बेरोजगारांना गंडविण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. या आरोपींनी १४ संप्टेंबर २०१४ रोजी सोलापूर येथील रहिवासी सचिन किसन चव्हाण याला फोन करून कृषी विभागात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले होते. सोबत ११ हजार रुपये घेऊन येण्याचे सांगितले होते. त्यानुसार सचिन काही बेरोजगार मित्रांना सोबत घेऊन नागपूरला गेला होता. त्यावेळी तेथे तब्बल १७ बेरोजगार मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यामध्ये अमरावतीत अटक करण्यात आलेला आरोपी उमेन्द राय सुध्दा होता. आरोपींनी या बेरोजगारांकडून ८ हजार ८०० रुपये, २ हजार खोली भाडे व २०० रुपये अर्जासाठी असे, एकूण ११ हजार रुपये घेतले. त्यानंतर बेरोजगारांना मल्टीलेव्हल मार्केटिंगसंदर्भात दोन महिन्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे पाहून ४ डिसेंबर २०१४ रोजी सचीन चव्हाण याने सोलापुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तेथून ती तक्रार वाडी पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी भवानी ट्रेडर्समध्ये धाड टाकून तिन्ही आरोपींना अटक केली. तेथून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. तेव्हापासून भवानी ट्रेडर्सला कुलुप लागले. मात्र, फसवणूक झालेल्या उमेंद्रच्या मनात काही वेगळीच कल्पना शिजत होती. अशाप्रकारे आपणही पैसे कमावू शकतो, या उद्देशाने उमेंद्रने अमरावतीत दाखल झाला. त्याने व्यंकैय्यापुऱ्यात भाड्याने खोली घेऊन वैष्णवी एन्टरप्राईझेस नावाने दुकानदारी सुरू केली. त्यांच्याशी हजारो बेरोजगार जुळले. मात्र, त्याचा हा धंदा अधिक काळ टिकू शकला नाही. उमेंद्रने महाराष्ट्रभरात आपल्या कंपनीचे जाळे पसरविले असून पुढील चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत.