खोटी स्वाक्षरी करुन हडपले हजारो रुपये
By Admin | Updated: May 18, 2016 00:17 IST2016-05-18T00:17:06+5:302016-05-18T00:17:06+5:30
निमगव्हाण येथे मजुरांच्या नावे खोटे हजेरीपट भरुन व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या खोटया सह्या करुन २८ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार

खोटी स्वाक्षरी करुन हडपले हजारो रुपये
पोलिसांत तक्रार : भ्रष्टाचाराला राजकीय वरदहस्त?
चांदूररेल्वे : निमगव्हाण येथे मजुरांच्या नावे खोटे हजेरीपट भरुन व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या खोटया सह्या करुन २८ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याप्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, ठाणेदार व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतरही त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, याप्रकरणी दोषी व्यक्तिंना राजाश्रय मिळत असून प्रशासन पाठबळ देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निमगव्हाण येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामांमध्ये मजुरांची बनावट नावे टाकून व सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या खोटया सहया करुन २८ हजार ७०० रुपयांचा अपहार केला. ही बाब २५ फेब्रुवारी २०१६ च्या मासिक सभेत सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांच्या उपस्थितीत चर्चेला आली. सर्वानुमते प्रत्यक्षदर्शीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून त्याने सभागृहात आत्महत्या करून सर्वांना फसविण्याची धमकी दिली. ही बाब निर्देशित करुन कारवाईची मागणी निवेदनाद्वारे तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात करण्यात आली. परंतु तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने रजिस्टर पोस्टाने ती तक्रार पाठविण्यात आली. १६ एप्रिल रोजी आयोजित ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत विषय क्र.१० अन्वये रोजगार पदावरुन काढण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते पारीत केला. तक्रारीची दखल तळेगाव पोलिसांनी न घेतल्याने चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. याउपरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषी रोजगार सेवकाला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)