‘त्या’ निर्दयी दाम्पत्याला अटक
By Admin | Updated: August 4, 2016 00:02 IST2016-08-04T00:02:15+5:302016-08-04T00:02:15+5:30
रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली होती.

‘त्या’ निर्दयी दाम्पत्याला अटक
स्त्रीअर्भक जमिनीत पुरले : रामा गावातील घटना
अमरावती : रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील ‘त्या’ निर्दयी दाम्पत्याला वलगाव पोलिसांनी मंगळवारी अटक केली.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामा गावातील रहिवासी सुधाकर पंजाब जुनघरे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत काही श्वान स्त्री जातीच्या अर्भकाचे लचके तोडत असल्याचे पोलीस पाटील नितीन बबन तेलखडे यांना आढळून आले. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपिंविरूद्ध भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला. स्त्री भ्रुणहत्येविषयी शासन कठोर असतानाही जिल्ह्यात स्त्रीअर्भकांच्या हत्येचे प्रकार उघडकीस येत आहेत. वलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.पी. सोनवणे यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली.
तिसरी मुलगीच झाल्याचा संताप
अमरावती: पोलिसांनी काही दिवसांत मृत अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. निर्दयी आई-वडिलांनी तिसरी मुलगी झाल्यामुळे संतापून ते स्त्रीअर्भक जमिनीत पुरले होते. ही माहिती समोर येऊनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.
तत्काळ दखल घेत गुन्हे शाखेच्या पथकाने रामा गावात जाऊन चौकशी सुरु केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष वेधून तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वलगाव पोलिसांनी मंगळवारी आरोपी सुभाष देवीदास जुनघरे या (४८) दाम्पत्याला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रामा येथील सुभाष जुनघरे दाम्पत्याला आधीच दोन मुली व एक मुलगा आहे.
सुभाष यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती.घटनेच्या दिवशी त्यांच्या पोटात कळा आल्या. मात्र, त्यांनी रुग्णालयात न जाता शेजारच्यांना बोलावून घरातच प्रसूती करून घेतली. मृत बाळ जन्मल्याने त्यांनी ते जमिनीत पुरले, अशी माहिती जुनघरे दाम्पत्याने पोलिसांना दिली आहे.
स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याप्रकरणातील दाम्पत्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
- एस.पी.सोनवणे,
पोलीस निरीक्षक,
वलगाव पोलीस ठाणे.