’त्या’ स्थलांतरित वाघाची वाघामाता मंदिर परिसरात 'साईटिंग'
By Admin | Updated: December 20, 2015 00:15 IST2015-12-20T00:15:14+5:302015-12-20T00:15:14+5:30
जिल्ह्यातील पोहऱ्याच्या जंगलात स्थलांतरित झालेला वाघ बुधवारी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास अमरावतीपासून...

’त्या’ स्थलांतरित वाघाची वाघामाता मंदिर परिसरात 'साईटिंग'
दुचाकीस्वार धास्तावले : वनविभागासह वन्यप्रेमी सतर्क
वैभव बाबरेकर अमरावती
जिल्ह्यातील पोहऱ्याच्या जंगलात स्थलांतरित झालेला वाघ बुधवारी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास अमरावतीपासून ८ ते १० किलोमीटर अंतरावरील वाघामाता मंदिराजवळ दुचाकीस्वारांच्या (साईटिंग) दृष्टीस पडला. त्या वाघाने रस्ता पार करताच दुचाकीस्वारांचा जीव भांड्यात पडला. यामुळे वनविभागासह वन्यप्रेमी सतर्क झाले आहे.
गतवर्षी पोहऱ्याच्या समृध्द जंगलात बोर अभयारण्यातील एक वाघ स्थलांतरित झाला होता. या जंगलात वाघांचे अस्तित्व असल्याचे ‘युथ फॉर नेचर कंझर्व्हेशन’ या संस्थेने सिध्द केले होते. जानेवारी २०१५ पासून वनविभाग व ‘युथ फॉर नेचर’ संस्थेने वाघाच्या हालचालींवर मॉनिटरिंंग सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्यात वाघाचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, दीड महिन्यापासून वाघ कॅमेऱ्यात ट्रॅप न झाल्याने वनविभाग सतर्क झाला. साधारणत: वाघांचा प्रजनन काळ नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान असतो. सध्या हा प्रजनन काळ सुरू असला तरी पोहऱ्याच्या जंगलात वाघीण नसल्यामुळे हा वाघ पुन्हा बोर अभयारण्यात वाघिणीच्या शोधात परतला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला होता. मात्र, बुधवारी किशोर चव्हाण व विक्की राजूरकर हे दुचाकीने पोहराकडे जात असताना त्यांना वाघामाता मंदिर परिसरात तोच वाघ मार्ग ओलांडताना आढळला आहे. त्यामुळे तो अद्यापही पोहरा जगंलात असल्याचे स्पष्ट झाले. वाघ आढळून आल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. शिकारी प्रतिबंधक पथक वाघाचे पगमार्क घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. तसेच वन्यप्रेमी स्वप्निल सोनोने यांनी वाघामाता मंदिर परिसरात जाऊन वाघाचे पगमार्क शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, खडतर भाग व गवत वाढल्यामुळे वाघाचे पगमार्क मिळू शकले नाहीत.