‘त्या’ तीन पोलिसांच्या नोकरीवर गंडांतर
By Admin | Updated: August 9, 2015 00:27 IST2015-08-09T00:27:59+5:302015-08-09T00:27:59+5:30
अंध व्यक्तीकडून पैशाची वसुली करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलीस आयुक्त ....

‘त्या’ तीन पोलिसांच्या नोकरीवर गंडांतर
चौकशी सुरु : अंधांकडून वसुली पडली महागात
अमरावती : अंध व्यक्तीकडून पैशाची वसुली करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. पोलीस विभागाला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे तीन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडातर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरु झाली असून कार्यालयीन चौकशीनंतर ही कारवाई पोलीस विभागाकडून केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
रेल्वेत गोळ्या, बिस्कीट व खेळणी विकणाऱ्या अंध व्यक्तीकडुन बडेनरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नोवा पिटर सालोमन, वाहनचालक शाम भाऊराव वाकपंजार व रुपचंद लक्ष्मण चंदेल यांनी पैसे घेतल्याची तक्रार येताच पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्याकडे आली होती. त्याअनुषगांने पोलीस आयुक्तांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेने सापळा रचून या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तिन्ही पोलिसांना निलंबीत करण्यात आले. आता तिन्ही पोलिसांची चौकशी सुरु झाली आहे. अंध व्यक्तिकडून पैसे घेणे ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी आहे. प्राथमिक चौकशीनंतर लगेच कार्यालयीन चौकशी केली जाणार असून त्यानंतर तिन्ही पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.