'त्या' चार मधुमेहींसाठी डॉक्टरच बनले देवदूत

By Admin | Updated: June 23, 2015 00:49 IST2015-06-23T00:49:53+5:302015-06-23T00:49:53+5:30

तालुक्यातील एकूण चार किशोरवयीन, जन्मजात आणि आर्थिक ऐपत नसणाऱ्या मधुमेहींना ...

'Those' four diabetics have become doctors | 'त्या' चार मधुमेहींसाठी डॉक्टरच बनले देवदूत

'त्या' चार मधुमेहींसाठी डॉक्टरच बनले देवदूत

मदतीचा हात : इन्सुलीन व्हायरल पुरवितात महिन्याला नि:शुल्क
मोर्शी : तालुक्यातील एकूण चार किशोरवयीन, जन्मजात आणि आर्थिक ऐपत नसणाऱ्या मधुमेहींना अमरावतीच्या दानदात्यांमार्फत दरमहा जवळपास अडीच हजार रुपयांचे इन्सूलीन व्हायरल मोफत पुरविली जात आहे.
येथील रशिक अहेमद हा १५ वर्षांचा मुलगा जन्मजात मधुमेहीचा रुग्ण आहे. त्याच्या लहानपणात माता-पित्यांचे निधन झाले. निराधार झालेला रशिक त्याच्या भावासह आजोबांकडे राहतो. खेड गावातील सारिका, सुनीता या किशोरवयीन मुली मधुमेहाने आजारी आहेत. याशिवाय काहीशा विमनस्क असलेल्या प्रतिभा या ३५ वर्षीय तरुणीला तिच्या आजीने आसरा दिला. रशिकसह हे सर्व रुग्न अगदी बालपणापासूनच मधुमेहाचे रुग्ण आहेत. सर्वांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे.
येथे नोकरीत असताना रुग्णांंच्या भल्यासाठी धडपड करणारे डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशी या रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क करुन त्यांचे मार्गदर्शन घेतले.रुग्णांवर मधुमेहाच्या गोळयांचा कोणताही सकारात्मक परिणाम होणार नसल्यामुळे डॉ.निकम यांनी त्यांना दरदिवशी इन्सूलीनचे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. प्रत्येक रुग्णाला दरमहा ५६० रुपयांचे ३ ते ४ इन्सूलीनचे व्हायरल लागतात. या चारही रुग्णांच्या नातेवाईकांना ‘दोन वेळच्या भोजनाची सोय नाही. इंजेक्शन आणायचे कोठून, असा प्रश्न डॉ. निकम यांच्या समोर उपस्थित केला.
रुग्णांवर योग्य उपचार झाले नाही तर ते मृत्युच्या दाढेत जाणार असल्याची संवेदना डॉ.निकम यांना होती. यातून मार्ग काढून त्यांनी अमरावती येथील त्यांचे मित्र डॉ.अरुण हरवाणी यांच्यासमोर या चारही रुग्नांची परिस्थिती कथन केली व मदतीची अपेक्षा व्यक्त केली. डॉ.हरवाणी यांनी त्यांच्या संपर्कातील एका दानदात्याला माहिती देऊन सहकार्याची विनंती केली. या दानदात्याने लगेच होकार देऊन दरमहा लागेल तेवढे इन्सूलीन मोफत पुरविण्याची तयारी दर्शविली; तथापि आपले नाव उघड न करण्याचे आणि कोणतीही प्रसिध्दी न देण्याची गळ डॉ.हरवाणी यांना घातली.
काही महिन्यांपासून हा दानदाता दरमहा डॉ.अरुण हरवाणी यांना इन्सूलीन व्हायरल उपलब्ध करुन देतो. त्यांच्याकडून डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यामार्फत या रुग्णांना देण्यात येतात. परिणामी या चारही रुग्णांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

चमकोगिरी करणारे धडा घेतील का !
स्वत:च्या प्रसिध्दीसाठी फ्लेक्स छापून, सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांना पाचशे-सातशे रुपयांचे फळवाटप करुन आपण फार मोठे उपकार केल्याची भावना बाळगून छायाचित्रांसह प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करणारी मंडळी समाजात आहे. दुसरीकडे या गरजू व गरीब रुग्णांना दरमहा जवळपास अडीच हजार रुपयांचे इन्सूलीन पुरविणारा दानदाता मात्र प्रसिध्दीपासून दूर राहण्याची धडपड करीत आहे. समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे. या सद्हेतूने या दानदात्याच्या कर्तव्याचा धडा चमकोगिरी करणारे घेतील का, हा खरा प्रश्न आहे.

Web Title: 'Those' four diabetics have become doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.