'त्या' दारूविके्रेत्यांची सीपींसमोर पेशी
By Admin | Updated: July 27, 2016 00:04 IST2016-07-27T00:04:17+5:302016-07-27T00:04:17+5:30
दारू विक्रेत्यांच्या मुजोरीला वैतागलेल्या गणोरीवासियांनी अवैध दारूचा मुद्दा थेट पोलीस आयुक्तांसमक्ष मांडल्याने त्यांनी मंगळवारी दारू विक्रेत्यांना हजर करण्याचे आदेश दिले होते.

'त्या' दारूविके्रेत्यांची सीपींसमोर पेशी
प्रभाव महिलाशक्तीचा : गणोरीतील अवैध दारूविक्रीचा मुद्दा
अमरावती : दारू विक्रेत्यांच्या मुजोरीला वैतागलेल्या गणोरीवासियांनी अवैध दारूचा मुद्दा थेट पोलीस आयुक्तांसमक्ष मांडल्याने त्यांनी मंगळवारी दारू विक्रेत्यांना हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सहा दारू विक्रेत्यांना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या कक्षात हजर केले असता आयुक्तांनी तीन दारू विक्रेत्यांना चांगलेच फटकारत चोप दिल्याची माहिती आहे.
भातकुली तालुक्यातील गणोरी येथील शेकडो महिलांनी सोमवारी अवैध दारू विक्रीसंदर्भात एल्गार पुकारला. दारू विक्रेत्यांच्या मुजोरीला वैतागलेल्या महिलांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडली.
त्यांनीही तक्रारीची तत्काळ दखल घेत दारूविक्रेत्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले व त्यांना हजर करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने सहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले.
दारू न विकण्याची ग्वाही
अमरावती : त्यात निजार खा मस्तान खा, सुभाष राणे, त्यांची पत्नी, विजय देठे, त्यांची पत्नी व दुर्गा वावरे यांचा समावेश आहे. मंगळवारी या सहा दारू विक्रेत्यांची पेशी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर करण्यात आली. त्यांनी दारू विक्रेत्यांना फटकारत तंबी देऊन पुरुष दारू विक्रेत्यांना चांगलाच चोप दिला. त्यामुळे दारू विक्रेत्यांनीही हात जोडून दारू न विकण्याची भूमिका दर्शविली. यापुढे आम्ही दारू विकणार नाही, अशी ग्वाही दारू विक्रेत्यांनी आयुक्तांना दिली. याप्रकरणात पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणल्याची चर्चा शहरात सुरू होती.
गणोरीवासीयांच्या उपस्थितीत दारू विक्रेत्यांना तंबी
गणोरीतील महिलांनी कैफीयत ऐकून पोलीस आयुक्तांनी अवैध दारू विक्रेत्यांना हजर करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. सोबतच दारू विक्रेत्यांना हजर केल्यानंतर गणोरीतील महिलांनीही उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी आठ ते दहा महिलांनी पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. गुन्हे शाखेने सहा दारू विक्रेत्यांना पोलीस आयुक्तांसमोर हजर केल्यावर गणोरीतील महिलांनासुध्दा कक्षात बोलाविण्यात आले. या महिलासमक्ष आयुक्तांनी अवैध दारू विक्रेत्यांना फटकारून तंबी दिली. ही बाब महिलांसाठी समाधानकारक ठरली आहे.