‘त्या’ नरभक्षक वाघाला जेरबंद करा अथवा ठार मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:43 IST2018-10-23T23:42:58+5:302018-10-23T23:43:18+5:30
धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर आणि अंजनसिंगी येथील दोघांना तीन दिवसांत नरभक्षक वाघाने ठार केले. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आ. वीरेद्र जगताप यांनी शासनाला दिला आहे.

‘त्या’ नरभक्षक वाघाला जेरबंद करा अथवा ठार मारा
अमरावती : धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर आणि अंजनसिंगी येथील दोघांना तीन दिवसांत नरभक्षक वाघाने ठार केले. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आ. वीरेद्र जगताप यांनी शासनाला दिला आहे. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांना त्यांनी पत्र दिले आहे.
तीन दिवसांत दोघांना वाघाने ठार केल्याने धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा वाघ किती जणांचे बळी घेणार, असा सवाल विचारू लागले आहेत. त्यामुळे वन विभागाने नरभक्षक वाघाला जेरबंद करावे अथवा ठार मारावे, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन वाघाला ठार मारू, अशा धमकीचे पत्र आ. जगताप यांनी शासनाला दिले. शेतीची कामे वाघाच्या दहशतीमुळे पूर्णत: बंद आहेत. आणखी किती दिवस असे गावकऱ्यांनी जगावे, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आ. जगताप यांनी लक्ष वेधले. शाळेत मुले जात नाही. महिलांमध्ये भीती आहे. परिसरातील गावकºयांचे जगणे असह्य झाले आहे. प्रसंगी गावकरी कायदा हातात घेऊन त्याला ठार मारतील. धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात वाघामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या वस्तुस्थितीबाबत आ. जगताप यांनी वनसचिवांना अवगत केली. दरम्यान, ग्रामस्थांना वाघासंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन आ. जगताप यांनी केले आहे.