‘त्या’ दोषी कर्मचाऱ्यांचे होऊ शकते निलंबन
By Admin | Updated: May 6, 2015 00:29 IST2015-05-06T00:29:22+5:302015-05-06T00:29:22+5:30
पीडिएमसीतील गुणवाढ प्रकरणाचा अहवाल अधिष्ठातासमोर ठेवण्यात आला.

‘त्या’ दोषी कर्मचाऱ्यांचे होऊ शकते निलंबन
डिन दिलीप जाणे यांचे स्पष्टीकरण : दोन दिवसात होणार निर्णय
अमरावती : पीडिएमसीतील गुणवाढ प्रकरणाचा अहवाल अधिष्ठातासमोर ठेवण्यात आला. त्यामधील तथ्यांची फेरतपासणी करुन दोन दिवसात निर्णय देऊ, असा ठाम विश्वास अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिला. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर निलबंनाची टांगती तलवार असून पाचही विद्यार्थ्यांना पाच वर्षांकरिता परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या पाच विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या परिक्षेत उत्तरपत्रिकेची पाने बदलवून गुणवाढ केल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत अॅटॉनॉमी विभाग प्रमुख रावलानी यांनी अधिष्ठातांकडे तक्रार केली. त्याकरिता अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल मंगळवारी जाणे यांच्या समक्ष ठेवण्यात आला असून अहवालाची सत्यता पडताळणी सुरु झाली आहे.
अशी राहील प्रशासकीय कारवाई
अहवालाच्या तथ्यांवरून दोषी कर्मचाऱ्यांचे निलबंन होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाचही दोषी विद्यार्थ्यांना पाच वर्षांकरिता परिक्षेपासून वंचित ठेवण्यात येऊ शकते. तसेच एमबीबीएसची ती परीक्षा रद्द करुन पुन्हा परिक्षा घेतल्या जावू शकते.
अहवालातील तथ्यांचे समाधान करणे गरजेचे असून सत्यता पडताळून पाहिल्यावर दोन दिवसात निर्णय देऊ, तसेच पुढे असे प्रकार घडल्यास सर्वश्री जबाबदारी त्या विभाग प्रमुखाचीच राहील अशा सूचना देऊ. दोषीवर प्रशासकीय नियमानुसार कारवाई नक्कीच होईल.
दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी