वरुडच्या नगराध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामचे थोरात
By Admin | Updated: July 19, 2014 00:37 IST2014-07-19T00:37:53+5:302014-07-19T00:37:53+5:30
वरूडच्या नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी एकच

वरुडच्या नगराध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामचे थोरात
अविरोध : राष्ट्रवादी, काँग्रेस, सेनेचा पाठिंबा
वरुड : वरूडच्या नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी एकच नामांकन दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामचे रवींद्र थोरात यांची ्अविरोध निवड झाली. येत्या २२ जुलै रोजी निर्धारित कार्यक्रमानुसार थोरात यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल.
नगराध्यक्ष,उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. स्थानिक पालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. सुरूवातीपासूनच या पदासाठी विरोधी पक्षनेता रवींद्र थोरात यांचे नाव आघाडीवर होते. थोरात यांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने एकच नामांकन दाखल झाले. त्यामुुळे थोरात यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड होईल. २३ सदस्यीय पालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना ७, राष्ट्रवादी ५, कॉग्रेस २, अपक्ष १, वरुड विकास आघाडी ३, विदर्भ जनसंग्राम ५ असे आहे. यंदा नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने जनसंग्राम वगळता एकाही पक्षाकडे उमेदवार नसल्याने थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या २२ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून त्यांच्या नावावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात येईल.
नगराध्यक्ष पदाचा अर्ज वैध आहे. उद्या १९ जुलै रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबविली जाईल. २२ जुलै रोजी विशेष सभेत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल.
- ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी, वरुड