थोर कर्मयोगी : संत अच्युत महाराज
By Admin | Updated: July 31, 2015 00:47 IST2015-07-31T00:47:42+5:302015-07-31T00:47:42+5:30
‘रूप सुंदर गुरूमूर्तीचे, सोन्यासम कांती झळके, केशरी टिळा भाळी शोभे, शोभे मस्तकी केशरी टोपी’ अशी गुरूमूर्ती म्हणजे संत अच्युत महाराज.

थोर कर्मयोगी : संत अच्युत महाराज
अमरावती : ‘रूप सुंदर गुरूमूर्तीचे, सोन्यासम कांती झळके, केशरी टिळा भाळी शोभे, शोभे मस्तकी केशरी टोपी’ अशी गुरूमूर्ती म्हणजे संत अच्युत महाराज. काही वर्षांपूर्वीपर्यंत अंबापेठेतील वाईकर कुटुंबामध्ये, कोल्हटकर मंगल कार्यालयात आणि संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात महाराजांच्या उपस्थितीत साजरा होणाऱ्या गुरूपूजा उत्सवाचे चलचित्र गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने डोळ्यांपुढे उभे राहते. कलीकाळात अच्युत महाराजांनी ओवीबध्द भागवत प्राकृत मराठीत लिहूून अद्वितीय ठेवा उपलब्ध करून दिला आहे. इतकेच नव्हे तर महाराजांनी महाभारताचे ५ खंड, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे चार वेद आणि १८ हजार श्लोकांचे भागवत लिहिले आहे.
भगवान श्रीकृष्ण परमधामाला जाताना उध्दवाला म्हणाले होते, ‘मी गेलो तरी माजे अस्तित्व या भागवत ग्रंथात ठेवून जात आहे’. याच अनुषंगाने संत अच्युत महाराज लौकिकार्थाने जगातून गेले असले तरी कृष्णाप्रमाणेच त्यांनी त्यांचे चैतन्य या ग्रंथांच्या रूपाने सर्वच ठिकाणी ठेवले आहे. गुरू पूजनासाठी शहरात नागपूर, चंद्रपूर, दर्यापूर, पांढुर्णा, मुंबई आदी शहरांतून शिष्य आले आहेत. वर्षभर महाराज यासर्व ठिकाणी सत्संगासाठी भागवत, महाभारत, रामायण, देवी भागवत आदींवर प्रवचन करण्याकरिता जात असत.
‘नामजप भागवताचे सप्ताह अनेक केले, रामायणी सत्संगी भक्त भक्तीतची न्हाले’. मात्र, महाराजांच्या जाण्याने ही परंपरा बंद झालेली नाही. ‘आपणासारिखे करिती तत्काळ, नाही काळ वेळ तयालागी’ असे म्हणतात. त्याप्रमाणे संत अच्युत महाराजांनी आपली कृपा सचिन देव या त्यांच्या सत्शिष्यावर केली आहे. महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून सचिन देव यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू आहे. महाराजांच्या पुण्याईच्या बळावर आणि आशीर्वादावर पश्चिम विदर्भात एकमेवाद्वितीय ठरलेले संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलची प्रगतीची कमान चढतीच आहे. महाराज गावोगावच्या प्रवचनातील सर्व पैसा एकत्र करून या हार्ट हॉस्पिटलला देत असत. तेच कार्य आजही त्यांचे शिष्य सचिन देव करीत आहेत.
रेवसा येथे महाराजांच्या वाढदिवसानिमित्त शिशू दिन साजरा करून शिशू व मातांचा वस्त्र देऊन सन्मान करण्याचा पायंडा महाराजांनी घातला होता. हे आजही सुरू आहे. राष्ट्रसेवा, कुष्ठरोग्यांची सेवा, हृदयरूग्णांची सेवा करूनच खरा परमार्थ साधला जाऊ शकतो, असा संदेश संत अच्युत महाराजांनी आयुष्यभर दिला. समाजसेवेची आगळी परंपराच त्यांनी घालून दिली. त्यांच्या शिष्यवर्गातर्फे ही परंपरा आजही जपली जात आहे.
शेंदूरजनाबाजार, बोरगाव धर्माळे, नागठाणा, मोझरी, वरूड, कौंडण्यपूर, तपोवन ही सर्व महाराजांच्या साधनेची ठिकाणे. या सर्वच ठिकाणी महाराजांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे कार्य सुरू आहेत. महाराजांनी बरेच काही दिले आहे. त्यांची शिकवण आचरणात आणणे, त्यांचे कार्य पुढे नेणे यातूनच आज खरी गुरूपूजा होईल.
- प्रतिभा पानट,
अमरावती.