दुष्काळात तेरावा..; महाविद्यालयात अडकले ५९ हजार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:21+5:302021-06-29T04:10:21+5:30
कोरोना संसर्गाचा परिणाम, महाविद्यालयातून अर्ज पडताळणीस विलंब, मागास विद्यार्थी त्रस्त्र अमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत मागास ...

दुष्काळात तेरावा..; महाविद्यालयात अडकले ५९ हजार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज
कोरोना संसर्गाचा परिणाम, महाविद्यालयातून अर्ज पडताळणीस विलंब, मागास विद्यार्थी त्रस्त्र
अमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत मागास विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती डीबीटीद्धारे दिली जाते. मात्र, गतवर्षीच्या मार्चपासून कोरोना संसर्गामुळे महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ५९ हजार ६१९ अनुसूचित जाती, ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. कोरोनामुळे शिक्षण गेले आणि शिष्यवृतीही मिळाली नाही, असा दुहेरी फटका मागास विद्यार्थ्यांना बसला आहे.
जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ६८७ मागास विद्यार्थ्यांनी सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाकरिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र, महाविद्यालये बंद असल्याने ५९ हजार ६१९ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीविना प्रलंबित आहेत. शिष्यवृत्तीचे काय झाले? याची विचारणा करण्यासाठी गावी असलेल्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण गाठणेही कठीण झाले आहे. शिष्यवृत्ती अडकल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशावरही परिणाम झाला आहे. मागास विद्यार्थ्यासह पालकही चिंतेत आहेे.
--------------------
एससी प्रवर्ग
- किती अर्ज ऑनलाईन सादर केले : ७३४३६
- समाजकल्याण विभागाने निकाली काढले : ५६३०६
-महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या : ५९३०
----------
व्हीजेएनटी, ओबीसी, एसईबीसी प्रवर्ग
- किती अर्ज ऑनलाईन सादर केले : ५५२५१
- समाज कल्याण विभागाने निकाली काढले : ४२२५५
-महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या : ३३१३
---------------------
कोरोना संसर्गाचा मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. ऑनलाईन नोंदणीनंतरही महाविद्यालयातून विलंबाने अर्जाची पडताळणी झाली. शिष्यवृत्तीबाबत अनेकदा शैक्षणिक संस्था, प्राचार्य यांच्याशी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. मात्र, महाविद्यालये बंद असल्याने शिष्यवृत्ती अर्जाची पडताळणी होऊन पुढे हे अर्ज पाठविण्यात आले नाही.
- विजय साळवे, उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती
---------------
गावी विद्यार्थी अडकले
‘‘ घरी असतानादेखील शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र, दीड वर्षानंतरही शिष्यवृत्तीची रक्कम खात्यात जमा झाली नाही. शिष्यवृत्ती विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी कोरोनामुळे महाविद्यालयात जाता आले नाही.
- विशाल बनसोड, राजना
‘‘ मागास विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शिष्यवृत्तीचा मोठा आधार असतो. शिष्यवृत्तीचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर काही आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदी करता येते. नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ झाले असताना जुन्या शिष्यवृत्तीचा पत्ता नाही.
- वैशाली कापडे, अमरावती