अंबादेवी संस्थान विश्वस्तांना उपस्थित राहण्याची तिसरी संधी
By Admin | Updated: December 15, 2015 00:07 IST2015-12-15T00:07:56+5:302015-12-15T00:07:56+5:30
एकवीरा व अंबादेवी मंदिराच्या जागेचा वाद व पत्रिका वाटून महाप्रसादाचे आयोजन केल्यासंदर्भात न्यास नोंदणी कार्यालयामार्फत अंबादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली होती.

अंबादेवी संस्थान विश्वस्तांना उपस्थित राहण्याची तिसरी संधी
अमरावतीकर निर्णयाच्या प्रतीक्षेत : पत्रिका देऊन महाप्रसाद वितरित केल्याचे प्रकरण
अमरावती : एकवीरा व अंबादेवी मंदिराच्या जागेचा वाद व पत्रिका वाटून महाप्रसादाचे आयोजन केल्यासंदर्भात न्यास नोंदणी कार्यालयामार्फत अंबादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये पाच विश्वस्तांना संबंधित प्रकरणासंदर्भात कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मात्र, आतापर्यंत दोनदा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता १५ डिसेंबर ही तिसरी तारीख विश्वस्तांना देण्यात आली असून ती शेवटची संधी राहण्याची शक्यता आहे.
अंबादेवी संस्थानच्या व्यापारी संकुलातील प्रतिष्ठान अगदी एकवीरा देवीच्या दर्शनी भागासमोरच उभारण्यात आले आहे. त्यामुळे एकवीरा देवी मंदिराचा दर्शनी भाग झाकला गेला आहे. यासंदर्भात एकवीरा देवी संस्थानतर्फे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात तक्रार दिली आहे. त्यातच नवरात्रौत्सवात अंबादेवीसह एकवीरा देवी संस्थानने महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या पत्रिका छापून जवळच्या नागरिकांनाच आमंत्रण दिले होते. त्यामुळे अनेक भाविकांना महाप्रसादापासून वंचित राहावे लागले. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच हजारो भाविकांनी वृृत्ताला समर्थन दर्शवून महाप्रसाद सर्व भक्तांसाठी खुला करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात धर्मदाय सहआयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यावर निरीक्षकांनी चौकशी सरू केली. या चौकशीत अंबादेवी संस्थान सहकार्य करीत नसल्याचे लक्षात आल्यावर विश्वस्तांना नोटीस बजावण्यात आली. अंबादेवी संस्थानने या प्रकरणाची कागदपत्रे घेऊन धर्मदाय सहआयुक्तांकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर न करता उपस्थिती सुध्दा दर्शविली नाही. यासंदर्भात विश्वस्तांना उपस्थित राहण्याकरिता दोनदा तारीख देण्यात आली. मात्र, विश्वस्तांनी स्वत: उपस्थित न राहता वकीलपत्र सादर केले. दोनदा तारखा दिल्यानंतरही अंबादेवी संस्थानचे विश्वस्त आतापर्यंत तारखेवर हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना तिसरी तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे १५ डिसेंबरला निश्चित केलेल्या तिसऱ्या तारखेला अंबादेवी संस्थान पदाधिकारी उपस्थित राहतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
एकवीरा व अंबादेवी संस्थानच्या जागेच्या वादाचे प्रकरण धर्मदाय सहआयुक्तांकडे न्यायप्रविष्ट आहे. सोबतच पत्रिकांचे वाटप करून महाप्रसाद वितरित करण्याच्या प्रकरणाची चौकशीही केली जात आहे. संस्थानाला दोनदा तारीख देऊन हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा तिसरी तारीख देण्यात आली आहे.
-आर.ए. गुल्हाने, निरीक्षक.